आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार

मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुरुदेव श्री श्री रवीशंकर उपस्थित होते.याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.

२४ जिल्ह्यात कामे करणार
जलयुक्त शिवार २ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली. या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यातील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळे कामे होणार आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालावधी असेल.

कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने व खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करेल.

चांगल्या योजनेसाठी गुरूदेवांचा आशीर्वाद
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण नेहमी म्हणतो की, जल हे तो कल है. पण हे पाणी जपून ठेवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. ग्लोबल वॉर्मिगमुळे आज अनेक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले. आज हा सामंजस्य करणारा करून जलयुक्त शिवारच्या कामाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची जोड देऊ शकलो ही मोठी गोष्ट आहे. मिशन मोडवर आम्ही जलयुक्त शिवार 2 टप्पा राबविणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जलयुक्त शिवार ही लोकांची चळवळ बनली याचे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिले. जालना जिल्ह्यात वाटुरमध्ये मी गेलो असताना जलयुक्त शिवारमुळे झालेली किमया पाहिली असेही ते म्हणाले.

गुरुदेव श्री श्री रवीशंकर हे चांगल्या कामांच्या पाठीशी नेहमी असतात, त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत हे भाग्य आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

धरणांमधील गाळ ही काढणार
यावर्षी पाऊस ही कमी झाला आहे त्यामुळे अगदी योग्य वेळी हा जलयुक्त शिवारचा करार होतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. तेथील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करीत आहे.

कॅन्सर सारखे रोग वाढत चालले आहे, त्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.जलयुक्त शिवारचे देशात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 22 हजार गावांमध्ये मोठे काम झाले. केंद्राने 2020 मध्ये जो अहवाल दिला त्यात महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेने वर आला असे नमूद केले आहे. यामध्ये अर्थातच सिंहाचा वाटा हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा आहे.

जलयुक्त शिवार दुसरा टप्पा तसेच विषमुक्त शेतीचा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम राबवून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राची भूमी अध्यात्मिक विचारांची- श्री श्री रवीशंकर
यावेळी बोलताना गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणाले की, गेल्या वर्षी 1 हजार शेतकरी महाराष्ट्रातून बंगलोरमध्ये आले होते. ते त्यांच्या खर्चाने आले होते, त्यांचे उत्पन्न वाढले होते. ते धन्यवाद देण्यासाठी आले होते. योजनेला राजाश्रय मिळून लोकांचा सहभाग मिळाला आणि त्यामुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली असे सांगून ते म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांनी स्वच्छ भारताची चळवळ सुरू केली आणि एक इतिहास निर्माण झाला हे उदाहरण आहे.

या जमिनीत विषारी घटक टाकून टाकून तिला आपण निष्प्रभ करतो आहोत. त्यामुळे नैसर्गिक शेतीची गरज आहे असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची भूमी अध्यात्माची शिकवण देणारी आहे असेही ते म्हणाले.

See also  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा