राष्ट्रपतींनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची भेट
पुणे, दि. ७: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवारी (दि. ६) नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना दिले. या निमंत्रणाचा तात्काळ स्वीकार राष्ट्रपतींनी केला असून या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेला २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९१९ च्या भारतीय कायद्यानुसार १९२१ मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन झाली. २०२१ मध्ये कोरोना सारखा गंभीर आजार असल्याने या शतकमहोत्सवी वर्षात कोणताही कार्यक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे यावर्षी विधान परिषदेचा शतक महोत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना देण्यात आले, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या शतक महोत्सवी कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वा विधान परिषदेच्या जुन्या सदस्यांसाठी व नवीन सदस्यांसाठी एक दिवसाची पूर्व तयारीची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला जवळपास १०० माजी सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच विधानपरिषदेतील कामकाजासंदर्भात विविध विषयावर ५ पुस्तके करण्यात येणार आहेत. यासाठी विधान परिषदमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या जेष्ठ पत्रकारांच्या ५ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

See also  विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल ऑगस्ट पर्यंत उभारणार