पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपुलाचे काम येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून, चौकात खांब उभारणीचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येईल. त्यासाठी उद्या बुधवारी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी विद्यापीठ चौक आणि लगतच्या रस्त्याची पाहणी करणार आहेत, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी सांगितले.
या पूलाचे काम गतीने होण्याबरोबरच येथे वाहतूक कोंडी होऊ नये, याचे नियोजन करण्यासाठी शिरोळे यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक घेतली. मेट्रोचे काम करणारी टाटा कंपनी, महापालिकेचा पथ विभाग, आणि वाहतूक पोलिस यांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पुलाचे काम गतीने करण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले . बुधवारी जागा पाहणी करण्याचे ठरले.
शिरोळे म्हणाले की तेथे चौकालगत असलेल्या खांबाची उभारणी 15 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे, तर फेब्रुवारी मध्ये चौकाच्या मध्यभागी खांब उभारणी सुरू करण्याचे नियोजन केले आहे. विद्यापीठ प्रवेशद्वार ते आरबीआयची इमारत दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. त्यामुळे शिवाजीनगर कडे जाणाऱ्या वाहनांसाठी एक जादा लेन उपलब्ध होईल. त्यामुळे तेथील वाहतूक बऱ्याच प्रमाणात सुरळित होईल. त्या रस्ता रुंदीकरणाची पाहणी बुधवारी करण्यात येणार आहे त्याचबरोबर रस्त्यावर मेट्रोचे पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक पोलीस त्यांचे नियोजन करतील. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या दृष्टीने विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे काम आव्हानात्मक आहे या चौकातून ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने तेथे सुरळीत वाहतूक ठेवण्याची आवश्यकता आहे शिरोळे यांनी हा उड्डाणपूल लवकर उभारण्याची मागणी विधानसभा अधिवेशनात केली होती त्यानंतर त्या संदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुमटा ची बैठक झाली होती. तेव्हा जानेवारी 2024 पर्यंत उड्डाणपुल बांधण्याचे ठरले होते. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन , रस्त्याचे रुंदीकरण या कामाला विलंब झाला. दरम्यानच्या काळात पुलालगत आवश्यक असलेली कामे करण्यात आली . आता मुख्य चौक आणि लगतचे खांब उभारणीचे काम हाती घेण्यात येत आहे , त्याच्या सहा महिन्यात ते काम पूर्ण करण्यावर भर देण्याचे आजच्या बैठकीत ठरविण्यात आले.
या बैठकीला पीएमआरडीए कमिशनर श्री राहुल महिवाल, पीएमसी कमिशनर श्री विक्रम कुमार, डिसीपी वाहतूक श्री विजय मगर, टाटा प्रोजेक्ट चे अधिकारी उपस्थित होते.