लहान मुले, युवक केंद्रित रस्ते सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

पुणे : जिल्हा रस्ते सुरक्षा समिती, युनिसेफ महाराष्ट्र, राईज इनफिनिटी फाउंडेशन, पर्यावरण शिक्षण केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुले तसेच युवक केंद्रित रस्ते सुरक्षा या विषयावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळा गुरुवारी (९ नोव्हेंबर) शासकीय विश्रामगृह येथे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस व वाहतूक पोलीस विभाग, विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

यावेळी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी रस्ते सुरक्षेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून जिल्हा केंद्रित रस्ते सुरक्षा आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंता बप्पा बहिर यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यशाळेत शाळा क्षेत्र (स्कूल झोन) नियमांची अंमलबजावणी, रस्ते अपघाताच्या प्रथम माहिती अहवाल नोंदणी पद्धतीमध्ये सुधारणा होण्यासाठी एकात्मिक रस्ता अपघात डेटाबेस (आय-रॅड) पद्धतीनुसार अपघातांची माहिती जमा करणे, पालकांसोबत दुचाकीवरून येणाऱ्या आणि सायकलवरून येणाऱ्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती, चारचाकीमध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी ‘सीआरएस’ प्रणालीची सक्ती करण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली. रस्ते संरचना करतानाच रस्ते सुरक्षेचा विचार करावा, स्कूलबस आणि कॅब यांच्या प्रभावी नियमावलीची अंमलबजावणी, ग्रामीण भागात महामार्गालगत असणाऱ्या शाळांसाठी रस्ते सुरक्षेची विशेष काळजी घेणे इत्यादी विषयावर विचारविनिमय करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत ७५ मास्टर प्रशिक्षकांना मुलांसाठी रस्ते सुरक्षा याविषयावर प्रशिक्षण देण्यात येणार असून जे पुढे विविध घटकांना प्रशिक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही कार्यशाळा मुलांसाठी रस्ते सुरक्षाविषयीच्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत अशा पुणे जिल्ह्यासाठीच्या लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी सर्वसमावेशक रस्ते सुरक्षा कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

See also  सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस