औंध इंदिरा वसाहत येथे संविधानाचा जागर

पुणे : इंदिरा-कस्तुरबा संविधान अभ्यास गटाच्यावतीने लोकायत संस्थेच्या सहकार्याने इंदिरा वसाहत बौद्ध विहार येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खेळ, प्रश्नमंजुषा, जादूचे प्रयोग यामाध्यमातून संविधानातील मूल्ये वस्तीमधील लहान मुले, महिला, नागरीक यांनी समजून घेतली.


या कार्यक्रमाच्या संयोजनात सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ रणदिवे, सुमनताई, काका गरबडे, विशाल जोगदंड, शंकर भोसले, दीपक जाधव व लोकायत संस्थेच्या टीमने सहभाग घेतला. यावेळी पत्रकार दादाराव आढाव, मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे विष्णू श्रीमंगले उपस्थित होते.

वस्तीतीमधील नागरीक, गट सदस्य यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दीपक जाधव यांनी प्रास्ताविक करून संविधान दिन, त्याचे महत्त्व व आज सादर केले जाणारे कार्यक्रम याची माहिती दिली.
संतोष बाबा यांनी जादूचे प्रयोग सादर करीत करनी, भानामती याचे प्रात्यक्षिक केले. त्यानंतर त्यामागचे विज्ञान समजावून सांगितले. संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन व त्याचे व्यवहारात अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.


सजवलेल्या टेबलांवर वस्तीमधील मुला – मुलींची मोठी गर्दी झाली होती. त्यांना रांगेत उभे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. केवळ मुलांनीच नाहीतर वस्तीतील महिला, पुरुष यांनी ही टेबलाजवळ येऊन खेळत भाग घ्यावा असे आवाहन जमलेल्या लोकांना करण्यात आले. बिझनेसच्या खेळातून समाजवाद, भांडवलशाही या संकल्पना समजावून देण्यात आल्या. केवळ मुलांसाठी चपात्या लाटण्याचा खेळ ठेवण्यात आला होता. त्यावेळी चपात्या लाटणे, भांडी घासणे ही कामे केवळ मुलींनीच का करायची असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य या माध्यमातून त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला गेला.
दुसरीकडे प्रश्नमंजुषा चाललेली होती. तिथेही मुलांनी मोठी गर्दी केलेली होती. यावेळी संविधानाविषयी छोटे छोटे प्रश्न विचारण्यात येत होते. तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या मुला मुलींना छोटी पुस्तिका बक्षीस देण्यात आली. अनेक मुलांनी बरोबर उत्तरे देऊन या पुस्तिका मिळवल्या.

See also  जयेश संजय मुरकुटे यांच्या माध्यमातून बाणेर बालेवाडी परिसरामध्ये एक तरुण तडफदार युवा पिढीचे नेतृत्व उभारून येत आहे :- खासदार सुप्रिया ताई सुळे