गांधी जयंतीला कंत्राटी भरती, समूह शाळा आणि दत्तक शाळा आदेश मागे घ्या: आप ची मागणी

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये नऊ बाह्य सेवा पुरवठादार कंपन्यांकडून कंत्राटी स्वरूपात भरती चा आदेश तसेच कमी पटसंख्येच्या 15000 शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणे आणि पन्नास लाख देणगी देणाऱ्याचे नाव शाळांना पुण्याची देण्याची दत्तक शाळा योजना याबाबतचे आदेश काढले आहेत. या सर्वच आदेशांवर शिक्षक, विद्यार्थी आणि युवकांकडून मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त होत आहे. आम आदमी पार्टीने सुद्धा कंत्राटी भरती विरोधामध्ये पुण्यात आंदोलन केले होते. आता गांधी जयंतीच्या दिवशी सरकारने हे तिन्ही आदेश मागे घ्यावे अशी मागणी आप चे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

बाह्य पुरवठादार कंपनीमार्फत सर्व स्तरावरील कर्मचारी भरती करण्याने वर्षानुवर्ष अभ्यास करणारे , सरळ सेवा भरतीच्या अपेक्षा ठेवणारया युवकांवरती अन्याय होणार आहे. गुणवत्तेची अपेक्षा या कंत्राटी भरती मध्ये करता येणार नाही तसेच वंचित गटातील युवकांना आरक्षणाच्या मार्गातून मिळणारी संधी सुद्धा यामुळे हुकणार आहे. मंत्री महोदयांना या एजन्सी ठरवण्याचे अधिकार असल्यामुळे वशिल्याचे तट्टू आणि भ्रष्टाचाराने भरती होण्याची शक्यता आहे. तसेच एजन्सीला मिळणारे कमिशन हे अवाच्या सवा आहे. त्यामुळे या आदेश विरोधात आम आदमी पार्टीने पुण्यात आंदोलन केले होते.

नवीन शिक्षण धोरणाच्या आधारे कमी पटसंख्येच्या शाळा एकत्र करून समूह शाळा तयार करण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे १६००० शाळा या बंद केल्या जाऊ शकतात. परंतु या समूह शाळा योजनेमुळे वाड्या वसत्यांवरील तसेच दुर्गम भागातील मुलांचा शैक्षणिक हक्क नाकारला जाण्याची शक्यता आहे तसेच या दूरच्या शाळांमध्ये मुलींना पाठवण्यास पालक नकार देतील अशी शक्यता असल्याने ही योजना राबवू नये. उलट गाव तिथे शाळा या पद्धतीने व आप दिल्ली मॉडेल प्रमाणे सरकारी शाळा अधिक सक्षम ,गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारे केंद्रे बनवावीत. खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये सरकारी शाळांचा दर्जा अधिक चांगला व्हावा यासाठी अधिक निधी दिला जावा अशी मागणी मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याने त्याची जबाबदारी ही सरकारवर आहे आणि त्यामुळे या खर्चाचा वाटा, मदतनिधी खाजगी कंपन्यांना शक्यतो मागू नये आणि मागितला तरी त्याची नियमित मिळण्याची शाश्वती नसल्याने पर्यायी व्यवस्था शासनानेच करावी. तसेच शाळांना असलेली पूर्वापार चालत आलेली नावे बदलण्यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शवला आहे.
कंत्राटी भरतीच्या बाबत एमपीएससी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. समूह शाळा बाबत ग्रामीण भागातील पालक हा कमजोर असल्याने विरोध दर्शवू शकत नाही. त्याचा गैरफायदा सरकारने घेऊ नये. नई तालीम हा शिक्षणाचा भारतीय प्रयोग देणारे महात्मा गांधी व प्रत्येक हाताला काम, कामाला सन्मान अशी भूमिका मांडणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी शिंदे फडणवीस पवार सरकारने चुकांची दुरुस्ती करीत हे तिन्ही आदेश मागे घ्यावे अशी मागणी मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

See also  बालेवाडीत व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा