इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात पर्यावरणाचा जागर
अजानवृक्षाचे रोपण, सुवर्णपिंपळ बीज प्रसाद वाटप आणि परकीय जैविक आक्रमणाविरोधात शपथ

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमा इंद्रायणी तटावरील विविध गावात समाज प्रबोधन करत करत पुढे मार्गस्त होत आहे. याच परिक्रमेचा भाग म्हणून दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी श्रीक्षेत्र कुरवंडे इंद्रायणी नदी उगमस्थान येथे अनोख्या पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजक, स्थानिक ग्रामस्थ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेला वारकरी संप्रदाय यांनी पर्यावरणाचा जागर केला.

याप्रसंगी हरित आणि अध्यात्मिक वारसावृक्ष अर्थात अजानवृक्षाचे रोपण कुरवंडे गावातील कोराआई देवी मंदिर परिसरात करण्यात आले. सदर वृक्षाचे रोप हे आळंदीतील मूळ वृक्षापासून तयार करण्यात आले आहे. आळंदी येथील सुप्रसिद्ध सुवर्ण पिंपळाचा बीज प्रसाद देखील उपस्थित वारकरी व गावकरी यांना रोपणासाठी वाटण्यात आला. तसेच आपल्या राष्ट्रावर होणाऱ्या आगंतुक जैविक आक्रमणाविरोधातील माबि हरित चळवळीच्या प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन देखील याप्रसंगी करण्यात आले. इंद्रायणी नदीमध्ये होणारे जैविक व रासायनिक प्रदूषण, उपद्रवी परदेशी वनस्पती आणि जलचरांचा होणारा प्रादुर्भाव, याबाबत उपस्थितांशी संवाद साधण्यात आला. इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या समस्त वारकऱ्यांनी कुरवंडे गावापासून ते नागफणी (डूक्स नोज) इंद्रायणी नदी उगमस्थान कुंड आणि फणेश्वर महादेव मंदिरापर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा, पादुका, इंद्रायणी जल कलश, तुळस व अजानवृक्षाचे रोपे पायी पालखीतून पूजनासाठी नेण्यात आली. इंद्रायणी कुंड आणि फणेश्वर महादेव शिवलिंगावर इंद्रायणी आणि भारतभरातून संकलित केलेल्या पवित्र जलाचा जलाभिषेक करण्यात आला. याठिकाणी इंद्रायणी मातेची आरती, अभंग-गीते आणि पसायदान याचे भक्तिभावाने सादरीकरण देखील करण्यात आले. पर्यावरण, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा असलेल्या या क्षेत्राविषयी उपस्थित जनमानसात तसेच समाज माध्यमाच्या लिंक वरून सर्वदूर जागर करण्यात आला. जेणेकरून या महत्वाच्या स्थळ-महात्म्य विषयी जनमानसात साक्षरता व सजगता यावी. तसेच राज्याच्या – देशाच्या शासन व प्रशासनाने हे क्षेत्र व तिथला अद्भुत वारसा टिकवण्याच्या दृष्टीकोनातून धोरणात्मक योजना आखावी.

See also  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे


पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या अभियानात जनमानसात इंद्रायणी नदी, वारसावृक्षांबाबत काही अंशी जाण व आत्मीयता वाढावी आणि यामाध्यमातून त्यांचे जतन-संवर्धन व्हावे या उद्देशाने या अभियानचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीक्षेत्र कुरवंडे गावाचे ह.भ.प. सुभाष महाराज पडवळ, उपक्रमाचे आयोजक ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर, ह.भ.प. सागर महाराज लाहुडकर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन अनिल पुणेकर, संत साहित्याचे अभ्यासक-लेखक दत्तात्रय महाराज गायकवाड, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, कुरवंडे गावाचे ग्रामस्थ सुभाष पडवळ, निर्मला कडू, किसन मराठे, मनीषा कडू, वैशाली मातेरे, योगिता कचरे, पार्वतीबाई शिंदे, वैशाली बोरकर, बेबीबाई कडू, सुरेखा जांभूळकर, महादेव राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.