ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय पात्र कुटुंबानी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे.

स्वतःचे घर नसलेल्या इतर मागासवर्गीय कुटुंबांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यासाठी घरकुल मंजुरीचे काम सुरू करण्यात आले आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःचे पक्के घर नाही अशा लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये आपला अर्ज सादर करावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे. लाभार्थ्याकडे घर बांधण्यासाठी स्वतःची पुरेशी जागा (२७० वर्ग फूट) उपलब्ध असावी. लाभार्थी हा इतर मागासवर्गीय ओबीसी किंवा एसबीसी या संवर्गातील असावा. त्याने इतर घरकुल योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याने ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर अर्ज किंवा त्याची पोच drdapune2022@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असे जिल्हा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.

See also  मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात ही डीजे बंदी करावी सुनील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन