‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा – अजित पवार

बाणेर : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्र. ९ मधील तमाम अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार  अमोल रतन बालवडकर, पार्वती अजय निम्हण, बाबुराव दत्तोबा चांदेरे आणि गायत्री मोहन मेढे -कोकाटे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी बाणेर येथे सभेला संबोधित केले.

यावेळी अजित पवार म्हणाले, “पुणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. विविध भागांतून लोक रोजगारासाठी इथं येतात. जुना बाणेर, पाषाण, औंध या परिसराचा इतिहास पाहिला तर विकासाची मोठी क्षमता इथं आहे; मात्र पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन असे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आम्ही जात-धर्माच्या भिंती उभ्या करत नाही, तर सर्वांना सोबत घेऊन चालतो. ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं, त्यांना संधी मिळायलाच हवी, ही आमची भूमिका आहे.”

अजित पवार पुढे म्हणाले, आज वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. प्रदूषणाच्या बाबतीत पुणे शहराचा जगात चौथा क्रमांक लागतो, ही चिंतेची बाब आहे. कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा यासाठी नियोजन असतानाही अंमलबजावणी का होत नाही? हा खरा प्रश्न आहे. ११३० कोटींच्या विकास निधीची तरतूद असूनही केवळ ६०० कोटींचाच खर्च झाला. पैसे असूनही खर्च का होत नाहीत? हे नागरिकांना समजायला हवं.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजाला दिशा दिली, तर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी आयुष्यात एकही लढाई हरली नाही. त्यांची जिद्द आणि संघर्ष आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आज AI चा काळ आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी देणं अत्यंत गरजेचं आहे. CIIIT सारख्या उपक्रमांतून शिक्षण आणि रोजगारनिर्मितीसाठी आम्ही काम करत आहोत.

See also  संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला निवडून द्यावे : अरविंद शिंदे

मी कामावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. कोरोना काळात मी स्वतः मैदानात उतरून जनतेची काळजी घेतली, हे पुणेकर विसरलेले नाहीत. म्हणूनच, घड्याळ आणि तुतारी चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा. विकासासाठी निधी कधीच कमी पडू देणार नाही. तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे, असा शब्द सभेच्या निमित्तानं नागरिकांना दिला.

यावेळी औंध, बापोडी, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पाषाण या भागांतील विविध पक्षांतील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.