आगामी शिवजयंती उत्सव सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : दरवर्षी शिवभक्तांची वाढती संख्या पाहता सर्व विभागांनी समन्वयाने आगामी शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. वाहनतळ व्यवस्था, वाहतूक आराखडा आदींसह शिवभक्तांच्या सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांवर विशेष लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

जुन्नर येथे किल्ले शिवनेरी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शिवजयंतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जुन्नर तहसीलदार रवी सबनीस आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, पोलीस विभाग, वनविभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय), सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जुन्नर नगरपरिषदेने संयुक्तरित्या वाहनतळासाठी आरक्षित करावयाच्या जागांची पाहणी करुन त्याप्रमाणे आराखडा करावा. शिवनेरी पायथा तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्यावेळी गर्दी व्यवस्थापनासाठी पोलीस विभागाने वाहतूक आराखडा तयार करावा.

डॉ. देशमुख पुढे म्हणाले, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दर्शन सुरु असतानाही शिवजन्मस्थानाचे दर्शनाची रांग सुरु राहता येईल का याबाबत चर्चा करुन उपाययोजना कराव्यात. पुरातत्व विभागाने शिवजन्मस्थान वास्तू तसेच परिसराची स्वच्छता करावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रोषणाई आणि सजावट करावी. नागरिकांना सुरक्षिततेबाबत सूचना देण्यासाठी संबंधित विभागाने प्रवेशद्वारांच्या ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा तसेच सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. किल्ल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी ब्रॉडबँड लाईन घेण्याबाबत प्रस्ताव करावा जेणेकरुन वाय-फाय यंत्रणेच्या माध्यमातून शिवजयंती महोत्सवाचे थेट प्रक्षेपण करणे शक्य होईल.

शिवनेरीवर सौर पॅनेलद्वारे कायमस्वरुपी वीज देण्याबाबत प्रस्ताव

शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरुपी वीज उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सौर पॅनेल बसविता येतील का हे महाऊर्जाकडून तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करुन घ्यावी. याबाबत एएसआयसह सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. किल्ले शिवनेरीवर नव्याने कायमस्वरुपी निर्माण करावयाच्या सुधारणांसाठी निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

गडावर एखाद्या भक्ताबाबत आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना म्हणून आवश्यक वैद्यकीय साधनांसह प्राथमिक उपचारांसाठी तीन- चार खाटांची व्यवस्था करावी. तसेच दरवर्षीप्रमाणे गडाच्या रस्त्यावर नियोजित ठिकाणी आरोग्य पथके नेमावीत. यासह जुन्नर ग्रामीण रुग्णालय आणि अन्य खासगी रुग्णालयातही आवश्यक खाटा राखीव ठेवाव्यात. हृदयाशी संबंधित उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमावेत.

परिवहन मंडळाने अधिकच्या बसेसची व्यवस्था करावी, किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यांवर दिव्यांची व्यवस्था करावी. सर्व उत्सव व्यवस्थित होईल यासाठी दरवर्षीप्रमाणे प्रभावी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. स्थानिक स्वराज्य संस्था, वनविभागाने स्वच्छतेच्या अनुषंगाने पुरेशा फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

पंचायत समिती तसेच अन्य विभागांनी पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी दरवर्षीपेक्षा अधिक टँकरची व्यवस्था तसेच आरोग्य विभागामार्फत पाणी स्रोतांचे टीसीएलद्वारे निर्जंतुकीकरण, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले.

किल्ल्यावर जात असताना प्रवेशद्वारांच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच पोलीस प्रशासनावरही मोठा ताण निर्माण होते. त्यामुळे प्रवेशद्वारांच्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यासाठी या कालावधीत भक्कम बॅरिकेटींगची व्यवस्था एएसआयने निर्माण करावी, असे पोलीस अधीक्षक श्री. गोयल यावेळी म्हणाले.

आमदार श्री. बेनके तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य श्रीमती बुचके यांनी वीजपुरवठा, स्वच्छता आदींच्या अनुषंगाने सूचना दिल्या.

यावेळी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गतवर्षीपेक्षा अधिक कार्यक्रमांचे नियोजन केल्याचे पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा ढोक- पवार यांनी सांगितले. बैलगाडा शर्यत, कुस्ती, मॅरेथॉन, दुर्गोत्सव- हेरिटेज वॉक, टेंट सिटी, वडज व कुकडी धरण येथे वॉट स्पोर्ट्स, पॅराग्लायडींग, हॉट एअर बलून आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

त्याअनुषंगाने पर्यटन विभागाने त्यांना आवश्यक सुविधाची मागणी करावी तसेच त्यासाठी संबंधित विभागाला निधी उपलब्ध करुन द्यावा. पर्यटन विभागाने सर्व विभागांकडून आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

See also  शिवजयंती सोहळ्यात प्रथमच किल्लेदार साबळे यांचा स्वराज्यरथछत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी केले रथाचे उद्घघाटन