राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलांचा संघ उपविजेता तर मुलींच्या संघास कांस्य पदक

पुणे, दि. २४ : भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्याद्वारा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी  येथे आयोजित ६७ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या दिवशी १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धा बाद पद्धतीने संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलांचा संघ उपविजेता तर मुलींच्या संघास कांस्य पदक मिळाले.

आज झालेल्या स्पर्धेत बिहारच्या मुलांचा व मुलींचा संघ अजिंक्य ठरले तर मुलांच्या गटात महाराष्ट्र संघ उपविजेता तर दिल्ली संघ तृतीय क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात ओरिसा संघ उपविजेता तर महाराष्ट्र संघ तृतीय क्रमांकावर राहिला.

१९ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघ बिहार संघाकडून पराभुत होवून रौप्य पदकाचा मानकरी तर मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने छत्तीसगढ संघास ५२ गुणांनी पराभूत करुन कांस्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघातील तृप्ती पाटील ५, नम्रता पाटील २६, समृद्धी कदम ५, स्वाती हगवणे ६, सुमन रावत ५ व कावेरी बागुल २२ असे गुण मिळविले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भारतीय शालेय खेळ महासंघाचे निरीक्षक मुकेश कुमार यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी विकास चौरसिया, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते, शिल्पा चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
0000

See also  एकता महिला ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त महिलांची एकदिवसीय सहल व सन्मान