जातनिहाय जनगणना अल्पसंख्याकांसाठी गरजेचीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन

पुणे : ‘जातनिहाय जनगणनेतून अल्पसंख्याकांचे प्रश्न मार्गी लागतील. मात्र, केंद्रात सध्या असलेल्या सरकारला ते करायचे नाही. त्यामुळे देशभरातील सर्व अल्पसंख्याकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले. हे ढोंगी सरकार खाली खेचण्याची भावना देशभरातील जनतेत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

पुणे शहरातील अल्पसंख्याकांच्या शिष्टमंडळाने पटोले यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. नॅशनल कॉन्फरन्स फॉर माइनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहरातील  मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे, कारी मोहम्मद उद्रीस, मौलना काझमी, माजी नगरसेवक अजित दरेकर , रफिक शेख , रिजनल ख्रिश्चन समूहाचे लुकस केदारी, रिपाइंचे अशोक जगताप, शैलेंद्र मोरे, स्नेहा कांबळे, जीवन घोंगडे , सुफियान कुरैशी आदी उपस्थित होते.

नाना पाटोले पुढे म्हणाले की,‘सध्या देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण तयार झाले आहे. ते निर्माण करण्यात आपल्या सर्व समाजघटकांचा महत्त्वाचा वाटा आहे. आता आपण एकमेकांसोबत मतभेद व्यक्त करण्याची वेळ नाही. आपल्याला फक्त हुकूमशाही सत्तेला पायउतार करायचे आहे. कारण सध्या फक्त चारच लोक देश चालवत आहेत. त्यातील दोघे विकत आहेत, तर दोघे विकत घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील प्रत्येक उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे,’ असेही ते म्हणाले.  

प्रारंभी नॅशनल कॉन्फरन्स फॉर माइनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी भूमिका विशद केली. त्यानंतर वक्फ कमिटीचे अघ्यक्ष आमदार वजाहत मिर्जा, अरविंद शिंदे, सुवर्णा डंबाळे, लुकस केदारी यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी मनोगते व्यक्त केली.

See also  मराठी पाट्यांच्या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांचे औंध बाणेर सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकरांना निवेदन