बालेवाडी मध्ये सर्व उपाययोजना करूनही टँकरने पाणी विकत घ्यावे लागते

बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन एप्रिल २०२२ पासून पाणी प्रश्नावर पुणे महापालिका, विविध सरकारी विभाग यांच्याशी पाठपुरावा, आंदोलने करीत आहे. याला प्रतिसाद म्हणून मागील वर्षी ३.८ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनचे काम महापालिके तर्फे पूर्ण करून बालेवाडीत नव्याने बांधलेल्या दोन टाक्यात पाणी सोडून ते बालेवाडीला पुरविले जात आहे. या शिवाय काही भागात पाणी वितरण करण्यासाठी नवीन पाईपलाईनचे काम देखील करण्यात आले. असे उपाय करूनही पाणी प्रश्न पूर्णतः सुटलेला नाही व अनेक सोसायटींना पाणी टँकरने विकत घ्यावे लागते.


बालेवाडी फेडरेशन तर्फे याचा सखोल अभ्यास केला असता असे आढळून आले आहे की येथील एकूण लोकसंखेचा विचार करता अपुरे पाणी मिळत आहे. या बाबतीत फेडरेशन तर्फे महापालिका आयुक्त यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले आणि त्यांच्या निर्देशानुसार पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी सखोल चर्चा केली. या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे प्रतिनिधि हजर होते. येथील लोकसंखेचा विचार करता बालेवाडीस ३.५ एमएलडी पाणी कमी मिळते हे पालिका अधिकाऱ्यांना समजावून सांगितले. यावर ताबडतोब उपाय म्हणून ज्या सोसायटीत पाणी कमी येते तेथे पालिका अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपाय योजावे, सध्याचे पाणी नुकसानीचा ( एन आर डबलू ) शोध घेऊन त्यावर उपाय योजना करणे, पाणी चोरीसाठी दंडात्मक कारवाई, पाणी गळती शोधून काढणे व पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे असा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला. पुढील बैठक ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्याचे ठरले.
याच बैठकीत बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने “पाणी वाचवा,जीवन वाचवा” अंतर्गत हाती घेतलेल्या “पाणी जपून वापरा” मोहिमेबद्दल पालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली. पालिका अधिकाऱ्यांनी मोहिमीचे कौतुक करून या संदर्भात अधिक माहिती सांगितली. फेडरेशन तर्फे यश चौधरी, मोरेश्वर बालवडकर, ॲड. माशाळकर, ॲड. परशुराम तारे व रमेश रोकडे यांनी बैठकीत भाग घेतला. 
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन केवळ पाणी पुरवठा वाढवावा म्हणून काम करीत नसून नागरिकांना “पाणी जपून कसे वापरावे” यावर मार्गदर्शनपर मेळावे वेगवेगळ्या सोसायटीत घेत आहे.

See also  जी.डी.सी. अँड ए. तसेच सी.एच.एम. परीक्षेचा निकाल जाहीर

याच मोहिमेचा भाग म्हणून नुकताच पहिला कार्यक्रम सुप्रिम पाम सोसायटीत पार पडला. अस्मिता करंदीकर, शुभांगी इंगवले, यश चौधरी या फेडरेशनच्या सदस्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुप्रिम पाम सोसायटीचे चेअरमन राजू रंगास्वामी यांनी मोहिमेचे उद्घाटन केले. मोरेश्वर बालवडकर यांनी फेडरेशन तर्फे बोलतांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आणि एरोटर इत्यादीचा वापर करावा असे सांगितले. सुप्रिम पाम सोसायटी सदस्य, गृहिणी, घरकाम करणारा स्टाफ उपस्थित होते. एरोटर प्रात्यक्षिके सादर केली गेली.