पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०२४-२५ व २०२५-२६ च्या मृग बहारासाठी डाळिंब, पेरू, चिकु, लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ व द्राक्ष या ८ फळपिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखण्यास मदत होते. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छीक आहे.

उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेत नुकसान भरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येणार असून त्यामुळे मानवी हस्तक्षेप राहणार नाही.

डाळिंब फळपिकासाठी खेड, दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, शिरूर व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत १४ जुलै असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ८ हजार रूपये असा आहे. 

पेरू फळपिकासाठी इंदापूर, खेड, पुरंदर, हवेली, भोर, बारामती, दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागाची अंतिम मुदत २५ जून आहे. चिकू पिकासाठी आंबेगाव, इंदापूर, दौंड, भोर, जुन्नर, पुरंदर, शिरूर व बारामती तालुके अधिसूचित असून सहभागाची अंतिम मुदत ३० जून आहे. सिताफळ पिकासाठी आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर, शिरूर व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत ३१ जुलै आहे. या तिन्ही पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ३ हजार ५०० रूपये असा आहे.

लिंबू फळपिकासाठी इंदापूर, शिरूर, बारामती व  दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत २५ जून असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ४ हजार रूपये असा आहे. संत्रा पिकासाठी शिरूर तालुका अधिसूचित असून सहभागाची अंतिम मुदत २५ जून तर मोसंबी पिकासाठी  इंदापूर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत ३० जून आहे. दोन्ही पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख रूपये आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ५ हजार रूपये असा आहे.

द्राक्षे क फळपिकासाठी इंदापूर,  बारामती  व आंबेगाव  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी अंतिम मुदत २५ जून असून विमा संरक्षित रक्कम ३ लाख ८० हजार रूपये  तर  शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता १९ हजार रूपये असा आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी  बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स या कार्यान्वयीत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००२०९५९५९ किंवा ई-मेल आयडी bagichelp@bajajallianz.co.in  वर संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

See also  शिरुर उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सर्व मंडळ स्तरावर ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन