आसाम सेवा हक्क आयोगाने जाणून घेतली महाराष्ट्रातील कार्यप्रणालीची माहिती

पुणे : आसाम राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती मोनिका बोर्गोहेन आणि आसाम राज्य सेवा हक्क आयोगाच्या उपसचिव श्रीमती मिताली लाहकार यांनी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या पुणे विभागीय कार्यालयास भेट देऊन राज्य आयोगाची कार्यपद्धती, पुरविण्यात येणाऱ्या सेवा आदी माहिती जाणून घेतली.

पुणे मनपा ढोले रोड क्षेत्रीय इमारतीतील आयोगाच्या कार्यालयास भेटीप्रसंगी राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे, उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी, शिल्पा पुरोहित आदी उपस्थित होते.

राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री. शिंदे यांनी यावेळी राज्य आयोगाची आणि पुणे विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. अधिनियमाद्वारे अधिसूचित केलेल्या सेवा, सेवा न मिळाल्यास करावयाचे अपील यांची माहिती देऊन पुणे विभागात सेवांसाठी प्राप्त मागणी, पुरविण्यात आलेल्या सेवा, अपील व त्यावर झालेली कार्यवाही याची माहिती दिली.  आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सेवांसाठी अर्ज करण्यात येत असल्याने पारदर्शकता असल्याचे त्यांनी सांगितले.

आपले सरकार सेवा केंद्र, संग्राम केंद्र आणि सेतू केंद्रे यांच्या रचनेबद्दल माहिती देऊन पुरविण्यात आलेल्या सेवांचे प्रमाण ९० टक्क्यांच्या वर असून उर्वरित सेवांच्या निर्गतीची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

आसामच्या सेवा हक्क आयोगाने बऱ्याच बाबीमध्ये महाराष्ट्राच्या आयोगाचे अनुकरण केले असून या भेटीमुळे अजून त्याचा लाभ आसाम राज्यासाठी होईल असे श्रीमती बोर्गोहेन म्हणाल्या.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन