राजेंद्रकृष्ण कापसे यांना “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार

मुक्ताईनगर  : श्री संत मुक्ताबाई संस्थान, श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर यांच्या वतीने दिला जाणारा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार, ‘सकाळ’चे खडकवासलाचे बातमीदार राजेंद्रकृष्ण कापसे यांना जाहीर झाला आहे. श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथे या पुरस्काराची घोषणा श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मुक्ताईनगर येथे केली. या वेळी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, संदीप पाटील, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, विनायक हरणे आणि विश्वस्त उपस्थित होते.


ॲड.पाटील म्हणाले, श्री संत मुक्ताबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी सांप्रदायातील एका पत्रकाराला २०१९ पासून “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. संस्थानच्या २०१९ ला पहिला पुरस्कार महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांना देण्यात आला. त्यानंतर, दैनिक सकाळ पुण्याचे वरिष्ठ उपसंपादक शंकर टेमघरे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज मांढरे (सासवड) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


हा पुरस्कार आषाढी एकादशीच्या दिवशी बुधवार ता.१७ जुलै २०२४ रोजी सकाळी ११वाजता श्री संत मुक्ताबाई संस्थान मठ, श्री क्षेत्र पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
श्री.कापसे यांनी बारा वर्षे आषाढी वारीचे वार्तांकन केले आहे. दैनिक ‘लोकसत्ता’ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तसेच दैनिक ‘सकाळ’ मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वार्तांकन त्यांनी केले आहे. भागवत धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी काढली जात असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान(पंजाब) या सायकल यात्रेच्या नियोजनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थानने या पुरस्कारासाठी कापसे यांची निवड केली आहे.
यासह श्री.कापसे यांनी सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या माध्यमातून सिंहगडावर मद्यपान, मांसाहार बंदी करण्यासाठी वीस वर्षाहून अधिक काम करत आहेत. सिंहगडावर स्वराज्यनिष्ठ शिल्प उभारण्याच्या कार्य त्यांचा त्यांचा मोलाचा सहभाग आहे. खडकवासला परिसरात १९९८ पासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. सकाळ, लोकसत्ता अशा अग्रण्य दैनिकांमध्ये ते काम करीत आहे. पुणे शहर पत्रकार संघाचे ते संस्थापक अध्यक्ष व मुळशी पत्रकार संघाचे ते क्रियाशील सदस्य आहेत.

See also  संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला सांगवीमध्ये उत्साहात संपन्न