पुणे, दि. २५: उच्चशिक्षित, पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नवोन्मेषक, उद्योजक, व्यावसायिक नेतृत्व आणि स्टार्टअप निर्माते बनावे. तसेच गरिबी, वंचितता, युद्ध, अस्थिरता आदी इतर कारणांमुळे समाजाच्या परीघावर जगणाऱ्यांचा विचार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पदवीप्रदान सोहळ्यात श्री. बैस बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे अध्यक्ष आणि संस्थापक तसेच सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका तथा विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष बेबुकर सेक्का आदी उपस्थित होते.
स्नातकांनी नोकरी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे बनावे असा संदेश देतानाच राज्यपाल पुढे म्हणाले, आपल्या देशातील गरिबी आणि असमानता दूर करण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या आणि आपल्या संस्थांद्वारे काय चांगले करू शकतो याचा विचार केला पाहिजे. स्नातकांनी जनसेवेच्या क्षेत्रात सामील होण्याचाही विचार करावा. सार्वजनिक सेवेच्या माध्यमातून समाजासाठी, आपल्या माणसांसाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी एक चांगले जग घडवण्यासाठी उत्कृष्ट योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
सिम्बायोसिस ही देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून उदयास आली असून येथे जगभरातील अनेक देशांचे विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याने ही ‘वसुधैव कुटुंबकम’चे उत्कृष्ट उदाहरण आहे. मोठ्या संख्येने महिला पदवीधर पाहून येत्या काही वर्षात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या आणखी वाढेल अशी आशा श्री.बैस यांनी व्यक्त केली.
श्री. बैस पुढे म्हणाले, तीस वर्षांपूर्वीनंतर पुणे हे माहिती तंत्रज्ञान शहर बनल्याने आज हे हजारो नोकऱ्या निर्माण करणारे आयटी हब बनले आहे. त्यामुळे स्नातकांनी नवीन कौशल्ये आणि हस्तांतरणीय क्षमता शिकणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळे अनेक नोकऱ्या कालबाह्य होऊ शकत असल्या तरी नोकरीच्या अनेक नवीन संधीदेखील निर्माण करत आहे. आज या क्षेत्राशी परिचित असलेल्या पदवीधरांना नोकऱ्यांमध्ये नक्कीच एक अतिरिक्त फायदा होईल.
आपण केवळ कोणत्याही देशाचे नागरिक नसून जगाचे नागरिक आहात. जागतिक नागरिक या नात्याने जगासमोरील समस्यांची जाणीव असायला हवी. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल हा आता केवळ शैक्षणिक चर्चेचा विषय राहिलेला नाही. भीषण दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटा पाहत आहोत. येत्या काही दशकांमध्ये हवामान बदल आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आपल्या समाज आणि पर्यावरणासमोर आव्हाने निर्माण होऊ शकतात. पर्यावरण आणि पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी आपली भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
सिम्बायोसिससारख्या विद्यापीठामुळे जागतिक अनुभव मिळतो. येथे ज्ञान, अंतर्दृष्टी आणि कौशल्ये मिळवण्याव्यतिरिक्त, आपण सांस्कृतिक विविधतेने भरलेल्या चांगल्या वातावरणातदेखील रहाता. हे वातावरण आपला दृष्टीकोन विस्तारण्यासह उदार व्यक्ती बनवते, असेही श्री.बैस म्हणाले.
डॉ. मुजुमदार म्हणाले, स्नातकांनी पदवी प्राप्त करुन आपल्या देशात परतत असताना महात्मा गांधींच्या, गौतम बुद्धाच्या या देशाला आठवणीत ठेवावे. तसेच पुण्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलेल्या ऐतिहासिक शहराची आठवण ठेवावी. या देशातील ‘वसुधैव कुटुंबकम्’ चे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिम्बायोसिस संस्थेशी आठवणीच्या रुपाने कायम जोडले जावे. या देशाने आपल्या व्यक्तीमत्वाला आकार दिला आहे. जगाला आपल्या संस्कृतीचे मूल्य समजण्याचा काळ आला आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. येरवडेकर म्हणाल्या, या विद्यापीठात आफ्रीकन- आशियाई देशातील विद्यार्थी शिकत असल्याने त्यांच्या पदवीनंतर त्यांच्या देशात मोठा मान मिळतो. या विद्यार्थ्यांना येथील शिक्षणाबरोबरच भारतातील विद्यार्थ्यांनाही बहुविधतेचा, विविध देशातील संस्कृती समजून घेण्यात होतो. ते जागतिक नागरिक, जागतिक राजदूत बनतात. यावर्षी दुबईमध्ये सिम्बायोसिसचे कॅम्पस सुरू होत असल्याचेही त्या म्हणाल्या.
डॉ. रमण आणि श्री. बेबुकर सेक्का यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
पदवी प्रदान सोहळ्यात २६ विविध देशातील ८५ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. या सोहळ्याच्या निमित्ताने स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या देशाचे ध्वज राज्यपाल यांच्याकडे प्रदान करून एकत्रित केले.
कार्यक्रमाला सिम्बायोसिस विविध शैक्षणिक संस्थांचे अधिष्ठाता, संचालक आणि प्रमुख, विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी उपस्थित होते.
घर साहित्य/शैक्षणिक राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा संपन्न