पुणे : बाणेर-पाषाण परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन तर्फे गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम तलाव व फिरता विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे अडीच हजाराहून अधिक गणपतींचे पर्यावरण पूर्वक विसर्जन करण्यात आले. तर एक टन हून अधिक निर्माल्य संकलित करून खत निर्मितीसाठी पाठवण्यात आले.
माऊली पेट्रोल पंप ग्राउंड, बाणेर आणि कपिल आसमंत सोसायटी, सुतारवाडी, पाषाण या दोन ठिकाणी श्री गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली होती.त्याचप्रमाणे फिरता विसर्जन हौद – बाणेर, पाषाण, सुस, म्हाळुंगे, बालेवाडी सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरात विसर्जनासाठी सतत उपलब्ध होता.या उपक्रमात मूर्ती विसर्जनाबरोबरच आरतीची सोय व निर्माल्य संकलन केंद्रे देखील ठेवण्यात आली आहेत.साठलेल्या निर्माल्याचे कंपोस्टिंग करण्यात येणार आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी सांगितले की,
“नदी व जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम विसर्जन घाट ही काळाची गरज आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हा आमच्यासाठी प्रोत्साहन आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो, असा विश्वास या उपक्रमातून मिळतो.
यावर्षीही नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. “गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धन हा आपल्या उत्सवाचा अविभाज्य भाग व्हावा” असा संदेश फाउंडेशनतर्फे देण्यात आला.
























