पुणे, ता. १५ जुलै : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोमार्गावरील शिवाजीनगर ते पाषाणदरम्यानच्या टप्प्याचे, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम याची शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी आज पाहणी केली. या वेळी रखडलेल्या या कामाबद्दल त्यांनी अधिकार्यांना फैलावर घेतले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, तसेच सर्व संबंधित घटक संस्थांचे मुख्य अधिकारी यांसोबत शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते पाषाण रस्ता या दरम्यानच्या मार्गिकेची आणि विद्यापीठाजवळील उड्डाणपुलाच्या कामाची पायी फिरून पाहणी केली. या कामांमधील प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय त्रुटींमुळे नागरिकांची गैरसोय आणि त्यांना मनस्ताप होत असल्याचे निदर्शनास आले. प्रकल्पपूर्ततेला प्रामुख्याने प्रशासकीय दिरंगाईच कारणीभूत असल्यामुळे शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
ते म्हणाले, “कंत्राटदारांना दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करता आले नाही, ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. याविषयी अहवाल मागवून घेतला असून या मार्गावरील कोणत्याही बदलाविषयी नागरिकांना पूर्वसूचना दिली गेली पाहिजे, असे आदेश संबंधित संस्थाना दिले आहेत.”