योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा संपन्न

बाणेर : योगीराज पतसंस्थेच्या वतीने दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप इनोव्हेटिव्ह इंडिया चे कुलपती नितीन जाधव, लहान मुलांचे मेंदू रोग तज्ञ डॉ. विश्वनाथ कुलकर्णी, प्राचार्य जांबी, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे यांच्या शुभहस्ते बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी अनुश्री मैंद या विद्यार्थिनीचा बारावीच्या परीक्षेत 95% गुण मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, मुलांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचे हाच यामागील हेतू आहे. प्रत्येक वर्षी 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करायचा आणि त्यामधून 15 विद्यार्थी निवडून त्यांना दरमहा शिष्यवृत्ती द्यायची असा उपक्रम आहे. आतापर्यंत संस्थेने 165 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. तसेच शिष्यवृत्ती दिलेल्या विद्यार्थ्यांमधून 12 वी च्या परीक्षेत 97% गुण मिळविणाऱ्या श्रुती चमरे या मुलीला उच्च शिक्षणासाठी संस्थेने दत्तक घेतले आहे. याच बरोबर संस्था विविध प्रकारे करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
नितीन जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, तुम्हाला ज्या क्षेत्रात रस आहे तेच क्षेत्र निवडा. आधुनिकतेचा उपयोग शिक्षणासाठी करा असेही सांगितले. मृगजळाच्या मागे धावू नका, वास्तवतेचा विचार करून निर्णय घ्या.


डॉ. विश्वनाथ कुलकर्णी यांनी सांगितले की, मुलांनी पालकांनी दिलेले संस्कार आणि मूल्ये जपणे आवश्यक आहे. पुढील शिक्षण घेत असताना कष्ट आणि प्रामाणिकपणा अंगीकारल्यास यश नक्की मिळेल. जे गुण 10 वी च्या परीक्षेत मिळाले आहेत तेच सातत्य टिकविणे भविष्यात गरजेचे आहे. असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
        

याप्रसंगी प्रा. सुरेशमैंद, प्रफुल्ल चौधरी, रनखांब सर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, पालक, खातेदार व संस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित होते.आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी केले तर सर्वांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.

See also  शितळादेवी नगर महाळुंगे परिसरात सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी साधला नागरिकांशी संवाद