नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरीता महसूल विभागाने काम करावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि.१: राज्य शासनाच्यावतीने विविध लोककल्याणकरी योजना राबविण्यात येत असून त्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवून या योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्याकरीता महसूल विभागाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

मावळ तालुक्यात वडगाव येथे महसूल पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री  वयोश्री योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अशा विविध महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याकरीता सर्व संबंधित विभागाने काम करावे. शासनाचा महत्वाचा अंग म्हणून महसूल विभाग ओळखला जात असून विभागाच्यावतीने सर्व संबंधित विभागाच्या मदतीने विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येते. नागरिक आणि प्रशासन यांच्यामधला दुवा म्हणून महसूल विभाग करत असल्याने विभागाच्या कामकाजावरुन नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो, ही बाब विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवून काम करावे.

स्वच्छ व सुदंर माझे कार्यालय ही संकल्पना मनात ठेवून आपले कार्यालय आणि परिसर स्वच्छ व सुदंर ठेवावे. प्रत्येकांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या गेल्या पाहिजे, अडीअडचणीच्या अनुषंगोन सर्वांगीण विचार करुन न्यायिकदृष्टिकोन समोर ठेवून मार्ग काढला पाहिजे. दैनंदिन प्रकरणे रोजच्या निकाली काढावी. बदलत्या काळानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. शासनाच्यावतीने समाजाची सेवा करण्याची संधी देण्यात आली आहे, त्याला पुरेपूर न्याय दिला गेला पाहिजे.
महसूल पंधरवड्यात १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याकामी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, आपले प्रलंबित विषय मार्गी लावून घ्यावेत. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याबाबत वरिष्ठांना माहिती द्यावी, त्यामध्ये नक्की सुधारणा करण्यात येईल, असे डॉ. पुलकुंडवार म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांना लाभ घ्यावा- डॉ. पुलकुंडवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी अर्ज सादर केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे. पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अद्यापही अर्ज सादर न केलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्व पात्र महिलेला या योजनेच्या लाभ देण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणारे दाखले वेळेत उपलब्ध करुन घ्यावे, असे निर्देशही डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.

आमदार श्री. शेळके म्हणाले, शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरीता  गावपातळी ते जिल्हा पातळीपर्यंत प्रशासन काम करीत असते. प्रशासनाकडून तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी, समस्या, अडीअडचणी सोडविण्याकरीता नेहमी प्रयत्न केले जातात. लोकप्रतिनिधी या नात्याने शासनास सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे श्री. शेळके म्हणाले.

*नागरिकांचा महसूल विभागावरील विश्वास अधिक वृद्धींगत करण्याकरीता काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे*
डॉ. दिवसे म्हणाले, महसूल विभागाच्यावतीने महसुली कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, मोजणी करणे, अपील प्रकरणाची चौकशी करणे आदी कामे वेळेत मार्गी लावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा नागरिकांपर्यंत ठेवण्यासाठी १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.  विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने महसूल विभागाच्यावतीने नियंत्रण ठेवण्यात येते त्यामुळे महसूल विभाग आणि नागरिक यामधील नाळ आजही घट्ट टिकून आहे. नागरिकांच्या मनात आपले स्थान  राखून नागरिकांची सेवा करावी. ग्रामीण भागातील नागरिक महसूल विभागाला नेहमीच सहकार्य करीत असल्याने पुणे जिल्हा प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना विश्वास अधिक वृद्धिंगत करण्याकरीता काम करावे, असे डॉ. दिवसे म्हणाले.

यावेळी माजी मंत्री भेगडे यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय छाननी समितीत पात्र ठरलेल्या महिला लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती योजना, विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसेच कुणबी प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र आदी दाखल्याचे वितरण करण्यात आले.

महसूल पंधरवडा
जिल्ह्यात महसूल पंधरवडा निमित्ताने २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ३ ऑगस्ट मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, ४ ऑगस्ट स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, ५ ऑगस्ट कृषी मार्गदर्शन कार्यक्रम,  ६ ऑगस्ट शेती, पाऊस, दाखले, ७ ऑगस्ट युवा संवाद, ८ ऑगस्ट महसूल-जनसंवाद, ९ ऑगस्ट महसूल ई-प्रणाली, १० ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी, ११  ऑगस्ट आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, १२ ऑगस्ट एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा, १३ ऑगस्ट महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण,  १४ पंधरवडा वार्तालाप,  महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी,  कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

See also  राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे - अरविंद शिंदे, अध्यक्ष-पु.श.काँ.क.