बाणेर : बाणेर येथे अमोल बालवडकर यांच्या वतीने रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात भर पावसात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सक्षम अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने निवेदन जाळून पुणे महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी माझी नगरसेवक अमोल बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, अमर लोंढे, अनिल ससार, नारायण चांदेरे, शरद भोते, आशिष ताम्हाणे , सुंदर बालवडकर, सागर बालवडकर, मंदार रारावीकर, रोनक गोटे तसेच विविध सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे तसेच राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या सर्विस रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. नागरिकांचे आर्थिक व शारीरिक मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना पुणे महानगरपालिका प्रशासन खड्डे वाजवण्याकडे दुर्लक्ष करत असून खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली.
राधा चौक येथे आंदोलन सुरू असताना प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष करत निवेदन स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांना पाठवले नाही यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका यावेळी घेण्यात आली. दरम्यान आंदोलकांनी पुणे महानगरपालिकेला देण्यात येणारे निवेदन प्रत जाळून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
अमोल बालवडकर म्हणाले, रस्त्यांवर पडलेले खड्डे व वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत प्रशासन योग्य कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याबाबत आंदोलन सुरू असताना प्रशासनाने आंदोलनाची योग्य दखल न घेतल्याने निवेदनाची प्रत जाळून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.