जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य यंत्रणेकडील कामांचा आढावा

वनविभागाने वनपर्यटन अंतर्गत पूर्ण जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, : वनविभागाने वनपर्यटन अंतर्गत पूर्ण जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करावा व त्यानुसार निधी उपलब्धतेचा विचार करुन प्राधान्यक्रमाची कामे हाती घ्यावीत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य स्तर यंत्रणेकडील २०२२-२३ मध्ये मंजूर कामांच्या प्रगतीचा आढावा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. त्याअंतर्गत नगरपंचायत, नगरपरिषदेकडील महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महा अभियान योजना, महावितरण यांच्याकडील विद्युत विकास, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील इमारत बांधकाम, साकव बांधकाम, क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा साहित्य, क्रीडा साहित्य खरेदी, वन विभागांतर्गत वनपर्यटन, वृक्षारोपन आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दलितवस्ती सुधारणाअंतर्गत कामे घेताना समाजकल्याण विभागाने तालुकास्तरीय यंत्रणेच्या सहकार्याने प्रत्यक्ष पाहणी करुन कामांची आवश्यकता व प्राधान्यक्रम ठरवून घ्यावा. साकव बांधकामाबाबतही यंत्रणांनी बृहद आराखडा करुन उपयुक्ततेनुसार कामे सुचवावीत, असे मंत्री श्री. पाटील म्हणाले.

नगरपरिषद हद्दीतील दलितवस्तीतील पायाभूत सुविधा विकासाच्या कामे झालेली असल्यास नवीन कामे हाती घेण्यास वाव नसल्यास वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी, महिला व पुरुषांच्या कौशल्यविकासासाठी निधी देता येईल का याबाबत विचार करण्याची गरज आहे, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

यावेळी महावितरण अंतर्गत बारामती मंडळ, पुणे ग्रामीण मंडळ, पुणे शहर अंतर्गत विद्युत विकाससाची कामांचा आढावा घेण्यात आला. नवीन खांब, वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढ याअनुषंगाने कामांना गती द्यावी. शहरातील कामे महापालिकेशी समन्वय साधत करावीत, असेही ते म्हणाले.

See also  कोथरूड मध्ये पेट्रोल २४ रुपयांनी स्वस्त, वर्धापन दिनानिमित्त कोथरूड युवक राष्ट्रवादी तर्फे यशस्वी मोहीम