पुणे, दि.२४: आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गणेशोत्सव काळात मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
चतु:शृंगी पोलीस ठाणे व पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर मधील साफा बॅन्क्वेट हॉल येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सयाजीराव गायकवाड, महापालिका उपायुक्त अविनाश सपकाळ, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दाबकेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजाच्या एकजुटीसह गरजू लोकांना मदत होईल, या भावनेतून सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना मांडली. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव काळात जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यासाठी आपल्या देखाव्यांमधून महिला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा असे विषय साकारावेत.
गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तसेच, जनजागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करावे. त्यासोबतच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिला पाहिजे. या तिन्ही गोष्टींसाठी मंडळांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. कायद्याचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यामुळे गतवर्षी परवानगी घेतलेल्या मंडळांना पुन्हा परवानगीची गरज नाही. मात्र, परवानगी घेताना मंडळांनी नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. मंडळांनी महिलांची सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी उत्सव काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजग रहावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पोलीस उपायुक्त जाधव यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५० गणेश मंडळे असून गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याची माहिती दिली. गणेशोत्सवासाठी पोलीस दलाचे योग्य नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.