पुणे – एका टोळीने केलेल्या हल्ल्याची घटना लक्षात घेऊन, औंध परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.
एका टोळीने केलेल्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चतुःश्रृंगी पोलिस निरीक्षकांसमवेत आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली. चार हल्लेखोरांना पकडण्यात यश आले असून त्यांच्यावर कायद्यातील कठोर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित दोन संशयितांना लवकरच पकडण्यात येईल. अशी माहिती पोलीस निरिक्षकांनी आमदार शिरोळे यांना दिली.
औंध भागात पोलीस गस्त (पेट्रोलिंग)वाढवतील. परिसरातील पथदिवे वाढविले जातील, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
पोलिस पूर्ण सतर्क राहतील आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नागरिकांना दिले आहे.