साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरु करणार आमदार अमित गोरखे यांची माहिती 

पुणे : समाजातील पदवीधर युवकांना प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळावी, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने नजीकच्या काळात संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार अमित गोरखे यांनी दिली. या केंद्राला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त औंध येथील भारतरत्न पं भीमसेन जोशी कलामंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन व अमित गोरखे यांच्या सत्कार सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी गोरखे बोलत होते.

विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते गोरखे यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, फुले पगडी असे या सत्काराचे स्वरूप होते. जेष्ठ नेते शंकरभाऊ तडाखे हे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी नगरसेवक दत्ताभाऊ खाडे, पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – इतिहास आणि आजचे वास्तव या विषयावर डॉ यशवंत गोसावी यांचे व्याख्यान देखील संपन्न झाले. 

पुरस्काराला उत्तर देताना अमित गोरखे म्हणाले, “या परिसरात माझी जडण घडण झाली आहे आणि येथेच सन्मान होतो आहे याचा आज मला आनंद आहे. आपल्या मातंग समाजासाठी महायुती प्रशासनाने खूप काही केले आहे त्यामुळे आता आपण सर्वजण महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.” आज मी आमदार झालो आहे ते तुम्हा सर्वांच्याच आशीर्वादाने आणि विश्वासाने याचाही गोरखे यांनी पुनरुच्चार केला.

यावेळी बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “आमदार अमित गोरखे आणि मी गेली अनेक वर्षे संघटनात्मक पातळीवर पक्षाचे काम करीत आहे. ते अतिशय कष्टातून पुढे आले आहेत. त्यांना विधान परिषदेत समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. ते नक्कीच चांगले काम करून सकारात्मक बदल घडवतील.”

प्रकाश वैराट यांनी सर्वांचे स्वागत करीत प्रास्तविक केले. डॉ यशवंत गोसावी यांनी उपस्थितांना  ‘अण्णाभाऊ साठे – इतिहास आणि आजचे वास्तव’ या विषयावर मार्गदर्शन केले.

सुभाष पाडळे, भरत रास्ते, अशोक लोखंडे, अनिल भिसे, आनंद छाजेड, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, तसेच माजी नगरसेविका स्वाती लोखंडे आदि पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर महिला आघाडीच्या वतीने देखील आमदार अमित गोरखे यांचा सन्मान करण्यात आला.

See also  विशाळगड अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार : १४ जुलै रोजी शिवभक्त विशाळगडावर जाणारच छत्रपती संभाजी राजे यांचा निर्धार