पिंपरी : विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप व त्यांच्या घरातीलच असलेले व शहर भाजपाचे अध्यक्ष शंकर जगताप, यांच्यातील विधानसभा निवडणुकीतील तिकिटासाठिची स्पर्धा पोटनिवडणूकी पासुन जनतेमध्ये चर्चेचा विषय बनलेली होती. आता येऊ घातलेल्या विधानसभेला ही स्पर्धा कोणत्या निर्णायक परिस्थिती पर्यंत पोहचते पहावे लागेल. वर्षभरापूर्वी पोट निवडणुकीला सबूरीची भुमिका घेतल्याने शंकर जगतापांचा तिकिटाचा दावा या वेळी अधिक मजबुत मानला जातो आहे.
असे असले तरी जगतापांच्या वाटेत त्यांच्याच पक्षाचे तेव्हढेच प्रबळ नेते दावा ठोकुन आहेत. भाजपाचेच नगरसेवक असलेले व लक्ष्मण जगतापांचे समर्थक म्हणुन ओळखले जाणारे शत्रुघ्न काटे हे सुध्दा आता मैदानात प्रबळ दावेदार म्हणून उतरेले आहेत. एका न्युज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आपण भाजप पक्षाकडे तिकीटासाठी मागणी केल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिवाय भाजपाने जर तिकीट नाकारले तर आपले कार्यकर्ते जो पर्याय निवडतील तशी आपली भूमिका राहिले असा स्पष्ट संदेश त्यांनी पक्षाला दिलेला आहे. अशातच महा युतीचाच भाग असलेल्या राष्ट्रवादीने हि आपला दावा सांगायला सुरुवात केली आहे. नाना काटे राष्ट्रवादीच्या माध्यमातुन चिंचवड मधुन पुन्हा एकदा नशिब आजमावयाच्या तयारीत आहेत.दुसऱ्या बाजूला सेनेचे नेते व मागील वेळी आघाडिचे गणित बिघडवणारे अपक्ष उमेदवर राहुल कलाटे हे सुध्दा आपला चिंचवड वरील दावा सोडणार नाहीत. मिळेल त्या परिस्थिती ते निवडणूक लढवतील हे नक्की.
हि स्पर्धेतील रंगत कमी होती की काय म्हणुन आता राजकारणाच्या कट्ट्यावर प्रत्येक्ष अजित दादांचाच चिंचवड मतदार संघांतील प्रवेशाने चिंचवड हा मतदार संघ आता राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. परंतु दादा स्वतः नक्की काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
समोर कोणीही असले तरी पक्षासाठी किल्ला लढायचा हा आपला उद्देश व जबादारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांनीही चिंचवड मध्ये तयारी चालू केलेली आहे. अजित पवार जर खरंच चिंचवडला आले तर त्यांना अंगावर घेण्याची हिंमत शहरात केवळ शरद पवार पक्षाचे तुषार कामठेच करू शकतात असे पक्षाचे कार्यकर्ते बोलताना दिसतात. लोकसभेच्या मोठया यशानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
नुकताच तुषार कामठे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी शहरभर त्यांची भावी आमदार म्हणून बॅनर बाजी केलेली दिसली. तर सांगवी मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची भव्य दहीहंडी घेऊन तुषार कामठे यांनी आपले इरादे स्पष्ट केले असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील तीन हि मतदार संघात तिकिटाची स्पर्धा जरी आज युतीचा अंगणात चालू असल्याचे दिसत असली तरी ती लवकरच आघाडीच्या अंगणात येऊन धाकडेल. सर्वच इच्छुक ऐन वेळी तुतारी वाजवण्याच्या तयारीत आहेत.
असे असले तरी बाहेरून कोणीही पक्षात येणार असले तरी पक्षातील निष्ठावंत व स्थानिक पक्ष नेतृत्वाचे मत काय आहे हे पाहूनच पक्ष प्रवेश दिला जाईल असे शरद पवारांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत नमूद केल्यानी इच्छुकांची काय भूमिका असेल ते पाहावे लागेल.
मागील काळात अजित गव्हाणे यांच्या रूपाने शहरात एक मोठा पक्षप्रवेश झाला त्यांच्या बरोबर अनेक आजी माजी नगरसेवक शरद पवारांच्या पक्षात आले असले तरी त्यांना अपेक्षित भोसरी विधान सभेच्या तिकिटाचा शब्द साहेबानी अजून तरी दिलेला नाही अशी चर्चा आहे.भोसरीत भाजपच्या महेश लांडगे यांचे मोठे आव्हान आघाडी समोर असेल. त्यामुळे तेव्हढ्याच ताकदीचा उमेदवार आघाडीला द्यावा लागेल. अजित गव्हाणे व रवी लांडगे हे सध्यातरी आघाडीवर दिसतात. आता मतदार संघ कोणत्या पक्षाला सुटतो त्याप्रमाणे गणित मांडले जाईल.
राखीव मतदारसंघ असलेल्या पिंपरीतून सध्याचे आमदार आण्णा बनसोडे अजित पवार गटाकडून निवणूक लढवतील हे जवळ जवळ नक्की आहे. निष्ठावंतांना शरद पवार डावलणार नाही त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील हि भूमिका साहेबांनी स्पष्ट केल्याने पिंपरीतील शरद पवार गटाच्या डॉ. सुलक्षणा धर यांचा दावा मजबूत झालेला दिसतो. मागील वेळेलाही ऐन वेळीच्या परिस्थितीत त्यांना माघार घ्यावी लागलेली होती. ती कसर यावेळी भरून निघाले का ते पाहावे लागेल. याचबरोबर गौतम चाबुकस्वार यांची देखील महाविकास आघाडीतून मोर्चे बांधणी सुरू आहे.
ज्यांची पाटी कोरी आहे, राजकीय समज व चुणूक आहे अशा नव्या आणि तरुण चेहऱ्यांना घेऊन लोकसभेत जे यश राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळते तोच पॅटर्न या वेळीही पवार राबवणार असे दिसते आहे.कोल्हापूर, सोलापूर, सातारा,सांगली मध्ये चालू असलेली तयारी पाहता पिंपरी चिंचवड हा या पॅटर्नला अपवाद ठरेल असे वाटत नाही असे जाणकार सांगतात.
तसेच लोकसभेला मावळ मतदार संघामध्ये महायुतीतून आलेल्या संजोग वाघेरे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी देण्याचा प्रयोग महाविकास आघाडीने यापूर्वी केला आहे. यावेळी पिंपरी व चिंचवड मतदार संघातून या प्रयोगाला फारशी पसंती मतदारांनी दिली नाही. अजित दादा पवार पक्षातून आलेल्या संजोग वाघेरे यांना यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणी व आगामी महानगरपालिका या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी मध्ये एकनिष्ठ राहिलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याप्रमाणे शहरांमध्ये सध्या तरी तयारी पाहायला मिळत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे सध्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.