महाविद्यालयात नवयुवा मतदारांची नावनोंदणी प्रक्रिया अभियान स्वरुपात राबवावी- स्वीप समन्वयक अर्चना तांबे

पुणे : भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये मतदान प्रक्रिया महत्वाची असून त्यात युवकांचा सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालयांनी नवमतदार नोंदणी प्रक्रिया अभियान स्वरूपात राबवावी, असे आवाहन ‘स्वीप’ समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वयक अधिकारी व कॅम्पस दूतांच्या प्रशिक्षण सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे आदी उपस्थित होते.

श्रीमती तांबे म्हणाल्या, मतदार साक्षरता मंडळामार्फत मतदार नोंदणी प्रक्रिया आणि मतदान प्रक्रियेसंबंधी व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाविद्यालयांनी युवा मतदार नोंदणीवर भर द्यावा. यापूर्वीही महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत बैठक आयोजित करुन प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करणे, त्याकरीता समन्वयक अधिकारी व विद्यार्थी दूतांची नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आगामी गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ गणेशोत्सव देखावा-सजावट २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अधिकाधिक मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीमती तांबे यांनी केले.

उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कळसकर म्हणाल्या, दरवर्षी १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर असे एकूण ४ अर्हता दिनांकानुसार मतदार नोंदणीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ व https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा अधिकाधिक वापर करावा. दिव्यांग नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज भरताना परिपूर्ण माहिती भरावी असे आवाहन त्यांनी केले.

मतदान प्रक्रियेविषयी जनजागृतीच्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रियाशीलतेचा विचार करता महाविद्यालयाने मीम्स, रांगोळी स्पर्धा, भित्ती पत्रक, निबंधस्पर्धा असे उपक्रम आयोजित करावेत. अधिकाधिक मतदार नोंदणीच्यादृष्टीने प्रयत्न करावे, असेही श्रीमती कळसकर म्हणाल्या.

यावेळी ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ तसेच मतदार सेवा पोर्टलचे सादरीकरण करण्यात आले.

See also  बाबुरावजी घोलप महाविद्यालयात बॅरिस्टर जयकर व्याख्यानमाला संपन्न