बाणेर : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील अपक्ष उमेदवार किरण रायकर यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागातील विविध प्रश्न जाणून घेतले. यावेळी त्यांनी प्रभागातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत मतदारांचे आशीर्वाद मागितले.
किरण रायकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विशेषतः महिलांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द दिला. “प्रभागातील प्रश्नांची जाण असणारा आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणारा उमेदवार निवडून यावा,” अशी अपेक्षा यावेळी महिलांनी व्यक्त केली.
लाँड्री व्यवसायाच्या माध्यमातून किरण रायकर हे दररोज घरोघरी पोहोचत असल्याने नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे त्यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
याप्रसंगी बोलताना किरण रायकर म्हणाले, “नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार केला आहे.”
























