पुणे, दि. १६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील राजकीय पक्षांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन श्री. भंडारे यांनी यावेळी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत राज्यात सर्व विधानसभा मतदार संघात २२ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून अखेरचा दिवस २९ ऑक्टोबर आहे. ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी तर ४ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती श्री. भंडारे यांनी दिली.
यावेळी श्री. भंडारे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देऊन उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज योग्य रीतीने बिनचूक भरण्याबाबत तसेच मतदार याद्या दुरुस्त्या, मतदान केंद्रावरील सोयीसुविधा, दिव्यांग मतदारांसाठीची सुविधा व मतमोजणी दरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी आदीबाबत माहिती दिली.
000