कोथरूड : बाणेर बालेवाडी परिसरामध्ये नदीवरील पायऱ्यांचा घाट व पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करून बांधलेली पाण्याची टाकी ही कामे आमदार असताना आम्ही केली. त्याचबरोबर बालेवाडी परिसरामध्ये सर्वे नंबर ४ मध्ये भव्य असे छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक रुग्णालय याचे भूमिपूजन देखील केले होते. दोन कोटी रुपये मंजूर असताना देखील या परिसरासाठी शासन अथवा महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगले हॉस्पिटल दहा वर्षात उभारू शकले नाहीत. परिसरातील नागरिकांची व नागरिकांच्या प्रश्नांची माझी पूर्वीपासून नाळ जोडली आहे यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक मला संधी देतील असे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.
चांदणी चौक मधील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा व आंदोलने यामुळे चांदणी चौकातील पुलाची निर्मिती शासनामार्फत करण्यात आली. वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.
गेले दहा वर्षांमध्ये नागरिकांच्या विकासाची अनेक कामे रखडली आहेत. नागरिक पुन्हा पाणी प्रश्न, रस्ते, लाईट याच विषयांवर आंदोलने करत आहेत. नागरिकांच्या प्राथमिक गरजा सोडवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले नाही. योजनांना मोठी नावे देण्यात आली आहेत परंतु त्यांची कामे फोल ठरत आहेत.
२४ बाय ७ पाणीपुरवठा योजना असून देखील नागरिकांना पाणी मिळत नाही कारण धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. स्मार्ट सिटी एरिया, औंध बाणेर घोषित करण्यात आला परंतु यामध्ये कोणताही स्मार्टनेस दिसत नाही. परिसराचे बकालीकरण करण्यात आले आहे. सांस्कृतिक विकासासाठी नाट्यगृहाची उपलब्धता नाही. शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवणे शक्य असताना देखील या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लोकप्रतिनिधींना सहजासहजी भेटता येत नाही.
नागरिकांचा प्रश्न मग तो कोणताही असो सोडवण्यासाठी त्यांना उपलब्ध होणारा त्यांच्यातील लोकप्रतिनिधी हवा आहे. ही बाब प्रचारात दरम्यान अनेक नागरिक सांगत आहेत. यामुळे कोथरूडकर म्हणून मला पुन्हा एकदा माझा परिसर विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मतदार संघातील नागरिक संधी देतील असे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी प्रचारादरम्यान सांगितले.