स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती संवेदना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती काम करताना संवेदना असतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशराज रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान २०२२-२३ करीता आरोग्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि एथिकल गव्हर्नन्स या श्रेणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

जमशेद भाभा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्टस (एन.सी.पी.ए.), नरीमन पॉईंट, मुंबई येथे यशराज भारती सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्ष आणि विश्वस्त श्रीमती दीपाली भानुशाली, डॉ एस.एस. मुंद्रा, यशराज रिसर्च फाउंडेशनचे सल्लगार डॉ.डी. के. जैन, प्रो. राम चरण, प्रो. गोविंदराजन पद्मनाभन आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वयंसेवी संस्था समाजाप्रती काम करताना त्यांच्यामध्ये संवेदना असतात. जे लोक समाजाप्रती काम करतात, ज्यांचे कार्य चांगले असते त्यांच्या पाठीमागे समाज उभा असतो. यशराज रिसर्च फाऊंडेशनचे समाजाप्रती अत्यंत चांगले कार्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, यशराज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि एथिकॅल गव्हर्नन्स या तीन श्रेणीतील काम चांगले आहे. या तीन श्रेणीवर शासन काम करत आहे.

यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान 2022-23 करीता आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम या श्रेणीसाठी ‘सर्च’ (SEARCH), गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार डॉ. अभय बंग व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथील  प्रा. नवकांता भट यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. लोकांचे जीवनमान उंचावणे या श्रेणीत ‘प्रदान’ (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे सरोज महापात्रा यांनी स्वीकारला आणि एथिकॅल गव्हर्नन्स या श्रेणीसाठी डॉ. अजय भूषण पांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्च (SEARCH), गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस व येथील  प्रा. नवकांता भट यांना  प्रत्येकी पन्नास लाख रुपये आणि प्रदान (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस आणि डॉ. अजय भूषण पांडे यांना प्रत्येकी एक कोटी रुपये पुरस्काराची रक्कम देण्यात आली. यावेळी डॉ.अजय पांडे यांनी पुरस्काराची एक कोटी रुपये रक्कम प्रधानमंत्री साहाय्यता निधीमध्ये देत असल्याचे जाहिर केले.

2022-2023 साठी यशराज भारती सन्मान खालील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आले.

See also  देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे

आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम : या सन्मानाची 2 श्रेणीत विभागून देण्यात आला. पहिली म्हणजे सर्च (SEARCH), गडचिरोली या संस्थेची जी दुर्गम भागात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. जी की विशेषत: नवजात बालकांच्या आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करते. या श्रेणीतील दुसरे सन्मानकर्ते प्रा. नवकांता भट आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे जो एकाच कन्सोलद्वारे अनेक निदान चाचण्या करतो. या मशिनच्या विकासामुळे आरोग्य सेवा क्षेत्रावर मोठा प्रभाव पडण्याची क्षमता आहे आणि ते अधिक कार्यक्षम आणि परवडणारे आहे.

लोकांचे जीवनमान उंचावणे: या वर्षासाठी हा सन्मान ‘प्रदान’ (PRADAN) या स्वयंसेवी संस्थेस देण्यात आला. ही संस्था बऱ्याच काळापासून विकास क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेने जवळजवळ 19,47,979 कुटुंबांपर्यंत मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ही संस्था महिला विकास आणि लिंग संवेदना याविषयावर चांगले काम करत आहे.

एथिकल गव्हर्नन्स : या श्रेणीसाठी हा सन्मान डॉ. अजय भूषण पांडे यांना देण्यात आला. डॉ.पांडे हे महाराष्ट्र केडरमधील सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि सध्या एप्रिल, 2022 पासून राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. गेल्या दशकभरात, डॉ. पांडे यांनी वित्त, आधार, डिजिटल पेमेंट आदी क्षेत्रात योगदान दिले आहे.