पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी सुनील शेळके यांना मतदान करा – संतोष दाभाडे

वडगाव मावळ – राज्यात पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी मावळातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदान करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घ्यावेत, असे आवाहन तळेगाव दाभाडे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संतोष हरीभाऊ दाभाडे पाटील यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना उबाठा पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराचे काम तुम्ही करणार का, असा थेट सवाल दाभाडे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केला. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ आंबेगाव येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा या पक्षांनी अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिल्यामुळे बापूसाहेब भेगडे यांच्या नावावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी यू-टर्न घेतला असून सर्व प्रकारच्या दबावाला झुगारून आता भाजपचे पक्षनिष्ठ नेते व कार्यकर्ते उघडपणे आमदार शेळके यांच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत आहेत.

संतोष दाभाडे म्हणाले की, भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी युती केली आहे. त्यानंतर सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी वाटलं की सगळे मिळून महायुती धर्माचे पालन करून पण प्रत्यक्षात वेगळेच घडले. काही कार्यकर्ते इकडे आहेत तर काही कार्यकर्ते तिकडे आहेत. पण भाजप हा शिस्तीचा व निष्ठेचा पक्ष आहे. एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य करावाच लागतो.

तळेगावमध्ये आमच्या दाभाडे परिवारातील ९९ टक्के घरे ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस बरोबर आहेत. दोन-तीन घरे मात्र पहिल्यापासून जनसंघ, भाजपशी एकनिष्ठ आहेत. मी भारतीय जनता पक्षाचा तळेगाव शहराध्यक्ष आहे. सर्वांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचे काम करायचे आहे, हा पक्षाचा आदेश आहे. मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती, असे संतोष दाभाडे यांनी सांगितले.

आमच्यावर जयवंतराव दाभाडे, नथुभाऊ भेगडे, केशवराव वाडेकर, बाळासाहेब जांभूळकर यांचे संस्कार आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही वाटचाल करतो. एकदा तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे १२ नगरसेवक तर शहर विकास समितीचे ११ नगरसेवक होते. अशा वेळी देखील नगराध्यक्ष निवडणुकीत कधीही कोणतीही गडबड झाली नव्हती, याकडे संतोष दाभाडे यांनी लक्ष वेधले.

सुनील शेळके यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची कामे महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत.  आमदार शेळके यांनी मुलांचे शाळा-महाविद्यालयातील प्रवेश, मोफत वैद्यकीय उपचार, हॉस्पिटलच्या बिलांमध्ये सूट, नोकरी, व्यवसायासाठी मदत अशी लोकांची कितीतरी वैयक्तिक कामे करून मदत केली आहे, याची संतोष दाभाडे यांनी उपस्थितांना आठवण करून दिली.

वरून पिपाणी, आतून तुतारी’
बापूसाहेब भेगडे यांची प्रतिमा ‘सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार’ म्हणून उभी करण्यात येत असून त्यांना पिपाणी हे चिन्ह मिळाले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा यांनी अधिकृत पाठिंबा दिल्यामुळे ते महाविकास आघाडीचेच अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वरून पिपाणी आणि आतून तुतारी, अशी विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते कधीही तुतारीचा प्रचार करणार नाहीत, असे संतोष दाभाडे म्हणाले.

See also  महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांचा ‘पुण्यभूषण’ने गौरव