पिंपरी चिंचवड शहरात बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत बाईक  रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. मतदानाच्या दिवशी शासकीय व खासगी आस्थापनांना   पगारी सुट्टी देण्यात आली असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा व इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.

या रॅलीचा निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आयुक्त श्री.सिंह यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त अविनाश शिंदे, राजीव घुले, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम,  महापालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, युथ आयकॉन उपक्रमातील स्पर्धक यांच्यासह विविध भागातून आलेले सुमारे ३५० पेक्षा अधिक बाईक रायडर्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

शहरातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. निगडी येथील भक्ती शक्ती चौकात जीएनडी ग्रुपच्या बालकलाकारांनी मतदार जनजागृतीपर नृत्य सादरीकरण केले. या कलाकारांनी आपल्या मनमोहक, चित्तथरारक व प्रबोधनात्मक नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तिनही मतदार संघातील प्रमुख मार्गांवरुन सुमारे ३३ किलोमीटर अंतराची बाईक रॅली काढण्यात आली.  रॅलीची सांगता भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झाली. 

See also  कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार