बँड पथकातील शिस्तबद्ध कवायतीतून शालेय जीवनात शिस्तीला चालना- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे : बँड पथकातील शिस्तबद्ध कवायतीतून शालेय जीवनात सकारात्मक शिस्तीला चालना मिळते. त्यामुळे प्रत्येक शाळेत बँड पथक असले पाहिजे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या मुलींच्या ब्रास बँड व पाईप बँड स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमानंतर दूरदृष्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्याहस्ते दूरदृष्यप्रणाली उपस्थित होते.

यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक अमोल येडगे, गुजरातचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव महेश कुमार मेहता, राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, एससीईआरटीच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, महाराष्ट्र संघासह राष्ट्रीय उपांत्य फेरीत सहभागी सर्व राज्यांच्या संघांनी उत्तम सादरीकरण केले. उत्तम सादरीकरणाबद्दल सर्व संघ, त्यांचे समन्वय अधिकारी अधिकारी, विद्यार्थी व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले. विविध राज्यातून अशा स्पर्धांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यात उत्तम क्रीडा सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

*शालेय घोष पथकासारखे उपक्रम अभ्यासक्रमाचा भाग असावा- प्रधान सचिव रणजितसिंह देओल*
प्रधान सचिव श्री. देओल म्हणाले, जिल्हा, राज्य अशा विविध स्तरातून बँड संघांनी यश संपादन केले हे कौतुकास्पद आहे. शालेय घोष पथके शाळेचे महत्त्वाचे केंद्र असते. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात घोषपथक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना उत्तम सांघिक कार्याचे धडे मिळतात. त्यामुळे शालेय घोष पथकासारखे सहशालेय उपक्रम अभ्यासक्रमाचा भाग असले पाहिजे.

श्री. येडगे म्हणाले, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय उपांत्य स्पर्धेसाठी उत्तम नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना स्पर्धेच्या सादरीकरणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित सात राज्यांच्या राष्ट्रीय उपांत्य बँड स्पर्धाअंतर्गत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मुलींच्या स्पर्धा २ डिसेंबर व मुलांच्या स्पर्धा ४ डिसेंबर रोजी संपन्न झाल्या.

*स्पर्धेचा निकाल:*

*ब्रास बँड (मुलींचा गट)-* प्रथम क्रमांक: मध्य प्रदेश, द्वितीय: गोवा, तृतीय: दादरा आणि नगर हवेली. *पाईप बँड (मुलींचा गट)-* प्रथम क्रमांक: गुजरात, द्वितीय: मध्य प्रदेश तर तृतीय क्रमांक: राजस्थान

*ब्रास बँड (मुलांचा गट)-* प्रथम क्रमांक: महाराष्ट्र, द्वितीय: मध्यप्रदेश, तृतीय: गुजरात, *पाईप बँड (मुलांचा गट)-* प्रथम क्रमांक: राजस्थान, द्वितीय क्रमांक: मध्यप्रदेश, तृतीय क्रमांक: महाराष्ट्र

See also  महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष यात्रा महत्त्वाची ठरली -शरद पवार