माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे कोथरूडचे भूमिपुत्र आहेत त्यांना संधी मतदारांनी द्यावी कोल्हापूरचे पार्सल परत पाठवा –  संजय राऊत

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे भूमिपुत्र आहेत. त्यांनाच नागरिकांनी पुन्हा संधी देऊन मतदारसंघातील विकासकामे करण्याची संधी द्यावी. असे आवाहन शिवसेनेचे ( उ बा ठा ) ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी कोथरूड येथे केले.


चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सकाळी चंद्रकांत मोकाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले होते. येथे झालेल्या छोटयाशा बैठकीत संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे,शिवसेना नेते प्रशांत बधे , पुणे शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेविका वैशाली मराठे, विकास पासलकर आदी मान्यवर उपस्थित होते.


संजय राऊत यांचा आज वाढदिवस होता. ते आले तेव्हा महिलांनी त्यांना ओवाळून त्यांचे औक्षण केले. तेथे उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांनी श्री राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री राऊत म्हणाले की , श्री मोकाटे यांना संधी देऊन मतदारांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व मंत्री चंद्रकांत पाटील यांना परत कोल्हापूरला पाठवून द्यावे. ( कोल्हापूरचे पार्सल परत पाठवा असे संजय राऊत म्हणाले ).
कोथरूड परिसरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कोयत्ता गँग आहे. यावर अंकुश ठेवण्याचे जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे की नाही आता जनता जागृत झाली आहे. ती निर्णय घेईल.
गेल्या 3 वर्षात उबाठा पक्ष टिकवण्याचं अवघड कार्य आम्ही करीत आहोत. भले भले पळून गेले. पण काही लोक अशी आहेत की काही मिळाले नाही तर चालेल, श्री मोकाटे त्यातले आहेत. संकटकाळात ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेवर येईल असा दावा करून ते म्हणाले की, महाविकास आघाडी चाच मुख्यमंत्री होईल. शिवसेनेच्या वाट्याला जागा कमी आल्या असल्या तरी पक्ष चांगल्या जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.निवडून येण्यासाठी आम्हाला सोन्याच्या रिंगा, पैशांची पाकीट वाटाव्या लागणार नाहीत. ज्यांना भिती वाटते, त्यांना असे उद्योग करावे लागतात.

See also  बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार -खासदार सुप्रिया सुळे


श्री मोकाटे म्हणाले की मी आमदार व नगरसेवक असताना चांगली विकासकामे केली. त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा विकासच खुंटला. आपण चांदणी चौकात होणारे अपघात टाळण्यासाठी आंदोलन केली. या आंदोलनात माझ्या बरोबर सर्व पक्ष, कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्था सहभागी झाले.  चांदणी चौकात उड्डाणंपुल करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन उड्डाणंपुल उभारला.