पाषाण येथील द लिव्हेअन्स अलेंटा बांधकाम व्यवसायिकाकडून नियम धाब्यावर बसून होत असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त

पाषाण : पुणे शहरांमध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत आहे त्यातच पाषाण परिसरामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकाम साईट मोठ्या प्रमाणात चालू आहेत. या बांधकाम व्यवसायिकांपैकी अनेक बांधकाम व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून आपली बांधकामे करत आहेत परंतु याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

बाणेर पाषाण लिंक रस्त्यावरील 36 मीटर रस्त्यालगत द लिव्हेअन्स अलेन्टा नावाचा बांधकाम प्रकल्प सुरू आहे. या ठिकाणी अनेक नियम धाब्यावर बसवून बांधकाम व्यवसायिक आपले कामे करत आहेत. या ठिकाणी मोठमोठ्या आवाजात रात्री देखील कामे चालू असल्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बांधकामा शेजारील सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांना धुळीच्या त्रासामुळे दमा तसेच हृदयासंबंधीत आजारांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सुरक्षेचे नियम पाळले न गेल्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना देखील जीव मोठे धरून जावे लागत आहे.

रात्री अपरात्री देखील या ठिकाणी मोठमोठ्या आवाजात बांधकाम चालू असल्यामुळे परिसरातील नागरिकांना या आवाजामुळे रात्रीचे झोपणे देखील अवघड झाले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष नोव्हेंबर महिन्यात पाहणी करून पुणे महानगरपालिकेला तातडीने कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे.

या बांधकामा शेजारी असणाऱ्या रहिवाशी इमारतींमधील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाकडे यासंबंधीत तक्रारी दिल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून देखील या बांधकाम व्यवसायिकांवर कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. या बाबत द लिव्हेअन्स अलेन्टा बांधकाम अभियांत्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही. बांधकाम व्यावसायिकावर वेळेवर  कारवाई होऊ नये याची काळजी प्रशासनातील बडे अधिकारी घेत असल्याचे दबक्या आवाजात सांगितले जात आहे.

रोहन कोकाटे ( तक्रार दार)
सदरील बांधकाम साइटवर मोठमोठ्या आवाजात रात्रंदिवस कामे चालू असतात, तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यापासून आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण विभाग यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून पाठपुरावा करत आहोत. परंतु दरवेळेस अधिकारी काही ना काही कारणे देऊन कारवाई करण्याचे टाळत आहेत. या ठिकाणी रहात असलेल्या जेष्ठ नागरिकांना या बांधकामामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

See also  देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे

राजेंद्र बनकर ( बांधकाम विभाग पुणे महानगरपालिका ) -सदरील बांधकाम व्यवसायिकाला वेळोवेळी सुरक्षेचे नियम पाळण्यासंबंधी तसेच रात्रीचे काम बंद ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे. परंतु या बांधकाम व्यवसायिकाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. येत्या आठवडाभराच्या आत मध्ये या बांधकाम व्यवसायिकावर कडक कारवाई करण्यात येईल.


सदरील बांधकाम व्यवसायिकाला वेळोवेळी सुरक्षेचे नियम पाळण्यासंबंधी तसेच रात्रीचे काम बंद ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे. परंतु या बांधकाम व्यवसायिकाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. येत्या आठवडाभराच्या आत मध्ये या बांधकाम व्यवसायिकावर कडक कारवाई करण्यात येईल.