पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन:नेत्र रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरतील-पालकमंत्री

पुणे :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नेत्र उपचारासाठी उभारलेल्या समर्पित रुग्णालयामुळे नागरिकांना नेत्र उपचाराच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून सर्व घटकातील नागरिकांना या सेवा निश्चितपणे उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय हॉस्पिटलसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, प्रशासक तथा महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता संजय खाबडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रुपाली महेशगौरी आदी उपस्थित होते.

महापालिकेने नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारच्या सुविधा नागरिकांना नेत्र उपचारासाठी उपयुक्त ठरतील, असेही पालकमंत्री म्हणाले.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नेत्ररोग विभाग नूतन नेत्र रुग्णालयात स्थलांतरित होणार असून त्याकरिता ८० खाटांची व्यवस्था तसेच ४ शस्त्रक्रिया विभाग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण रुग्णालयासाठी २५ कोटी ४६ लाख रुपये इतका खर्च झालेला आहे. शंकरराव मासुळकर आय हॉस्पिटल हे पदव्युत्तर संस्था वायसीएम रुग्णालयाशी संलग्नित राहणार असल्यामुळे नेत्ररोगाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र म्हणूनदेखील उपलब्ध होणार आहे. सामान्य नेत्ररोग निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू निदान शस्त्रक्रिया, पापण्यांचे आजार, लासरू शस्त्रक्रिया, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रेटिना तपासणी व उपचार, डोळ्यातील दाब वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरील उपचार, लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी व बालपणातील अंधत्व याबाबतचे उपचार, दृष्टिहीनांना कमी दृष्टी सहायकाबाबतच्या सुविधा आणि उपचार, डोळ्यांशी संबंधित सामुदायिक जागरूकता तपासणी आणि उपचार या अत्याधुनिक सेवा नेत्र रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहेत.

कचरा स्थलांतर प्रकल्पाचे उदघाटन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी गवळीमाथा आणि कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प येथे उभारण्यात आलेल्या कचरा स्थलांतर प्रकल्पा॑चे उद्घाटनदेखील पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे स्थानिक भागातील कचरा एकत्रित करून वर्गीकरण करण्यात येईल आणि कचरा कॉम्पॅक्ट करून हुक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेण्यात येणार आहे. प्रत्येक कचरा स्थलांतर केंद्राची क्षमता २०० मेट्रिक टन असून ओला व सुका कचरा वाहतूक करण्यासाठी वाहनासह एक हूक लोडर व ३ कंटेनरची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार असून इंधन बचत, हवेचे प्रदूषण कमी होणे, कचऱ्याची गळती कमी होणे आदी फायदे होणार आहेत. ४ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या कचरा स्थलांतर प्रकल्पांच्या स्थापत्य विषयक कामांसाठी दोन प्रकल्पांकरीता ९ कोटी ९१ लाख रुपये तर इतर दोन प्रकल्पांकरीता ८ कोटी १२ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मशिनरी व विद्युत विषयक कामांसाठी १८ कोटी ६५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

See also  सुनिल देवधर भाजपच्या प्रचारात दिसेनात !