सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील मराठी भाषा भवनची दुरावस्था शिवसेनेने केली कारवाईची मागणी

पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील मराठी भाषा भवनची इमारत बंद अवस्थेत असून याचा मुलांना उपयोग होत नाही ही बाब समोर आणण्यात आली.

एक मे 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मराठी भाषा भवनचे लोकार्पण करण्यात आले. परंतु त्या दिवसापासून आज पर्यंत मराठी भाषा भवनाचा एकाही विद्यार्थ्याला उपयोग झालेला नाही. आतील सर्व पुस्तके दोरीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सदर वास्तूला गळती लागल्याचे दिसून येते. निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे, लाईट नाही, पाणी नाही, बाथरूम नाही. बसायला खुर्च्या, टेबल नाही. उद्घाटनावर लाखो रुपये खर्च करूनही मराठी भाषा भवन वापरात येणार नव्हते तर याचे लोकार्पण का करण्यात आले ? मराठी भाषा भवनच्या चारही बाजूने पत्र्याचं कंपाउंड करून बंद ठेवण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी भिंतींचे प्लास्टर उखडलेले आहे. पुस्तकांवर धुळीचे साम्राज्य आहे. विद्यार्थ्यांना बसायला काहीही व्यवस्था नाही. विद्यार्थी येऊन याचा लाभ घेतात असं सांगितलं जातं, परंतु असे काहीही आढळून येत नाही. पुणे विद्यापीठाचे साडेसहाशे कोटीचे बजेट असून या बजेटचा अपव्यय होताना दिसत आहे. मुख्य इमारत ही हेरिटेज वास्तूमध्ये गणली जाते. तरीही इमारतीला बेकायदेशीररित्या होल मारून लाईट्स लावण्यात आले. त्याचा खर्च अडीच कोटी रुपये दाखवण्यात आला. तसेच विद्यापीठामध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु तशी केबल कुठेही टाकल्याचे किंवा राउटर बसविल्याचे दिसून येत नाही.

संसदेत मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे फर्मान काढले जाते. आणि याच महाराष्ट्रामधे मराठीची गळचेपी होताना दिसत आहे. मागील दहा वर्षापासून सदर मराठी भाषा भवनच्या ईमारतीचे काम सुरू आहे. परंतू लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मराठी माणसाचा विश्वास संपादन करण्यासाठी अर्धवट काम असताना लोकार्पण घाईघाईने केले गेले. कोनशिलेवर नाव याव म्हणून उद्घाटनाचा घाट घातला गेला का ? याप्रसंगी पुणे विद्यापीठात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, शहर समन्वयक युवराज पारिख, संघटक अजय परदेशी उपस्थित होते.

See also  लोकसभा निवडणुका संदर्भात पुणे शहर काँग्रेसची बैठक