पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटील होत चालली आहे. यावर उपाय करण्यासाठी पुणे शहराला कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी ई – मेल द्वारे पाठवले आहे.
त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की , देशात पुणे शहर हे मुंबई आणि दिल्ली पाठोपाठ महत्वाचे शहर आहे. शिक्षण, उद्योग आणि व्यवसायासाठी अनेक लोक पुण्यात स्थायिक झाले आहेत. यामुळे सध्या या शहराची लोकसंख्या पन्नास लाखांच्यावर आहे. पुणे महापालिकेत गेल्या ५ वर्षात ३४ गावांचा समावेश झाल्याने शहराच्या लोकसंख्येत आणखी भर पडली आहे. लोकसंख्येच्या मानाने पुणे सध्या देशातील सातव्या क्रमांकाचे शहर आहे. राज्यात मुंबई नंतर पुण्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
शहरात मेट्रो, दोन रिंग रोड, हायवे, विमानतळ, त्याचबरोबर वाहतुकीचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. दिवसेंदिवस वाढणारी वाहने आणि शहरातील रस्ते यांच्या असणाऱ्या व्यस्त प्रमाणामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आगामी काळात शहराचा आणखी वेगाने विकास होण्यासाठी या समस्या सोडवाव्या लागतील. यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या संपूर्ण वाहतुकीची जबाबदारी सक्षम आय.ए.एस किंवा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत पूर्ण वेळ पार पाडणे आवश्यक बनले आहे. सर्व वाहतूक प्रकल्पांचे एकत्रित नियोजन करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त किंवा पुणे महानगरपालिका आयुक्त या दर्जाचे अधिकारी नेमून ही समस्या सोडवण्याची गरज आहे. आयुक्त दर्जाच्या या अधिकाऱ्याला या समस्या सोडवण्यासाठी जास्त वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदाचा कालावधी नेहमीप्रमाणे न ठेवता किमान पाच वर्ष ठेवावा. अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. याबाबत सुनील माने यांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी सुद्धा पत्र देऊन अजित पवारांकडे अशी मागणी केली होती. लवकरात लवकर निर्णय घेऊन वाहतुकीच्या समस्येपासून पुणेकरांची मुक्तता करावी अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.