कोथरूड : कोथरुड मधील सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज अलंकार पोलीस स्थानकात जाऊन कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, तपास जलदगतीने करुन चोरांच्या मुसक्या आवळा, असे निर्देश दिले.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल पठारे आणि अलंकार पोलीस चौकीच्या निरिक्षक सुमिता रोकडे यांनी आरोपींची ओळख पटली असून, तपास शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच आरोपींना पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
त्यावर नामदार पाटील यांनी तपासाची गती वाढवा, आणि चोरांच्या मुसक्या आवळा, असे निर्देश दिले. तसेच, भविष्यात ही अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.