सिंहगडावर ‘आपला मावळा’ची स्वच्छता मोहीम ;
खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकाराने शेकडो शिवभक्तांचा सहभाग

खडकवासला : लोकसहभागातून गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनाची गरज असुन त्यासाठी समाजानेही पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी सिंहगड स्वच्छता अभियानाप्रसंगी केले. या वेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी  या उपक्रमासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून आलो नसुन छत्रपती शिवरायांचा एक शिवप्रेमी मावळा म्हणूनच या मोहिमेत सहभागी झालोय असे सांगितले.

खासदार निलेश लंके  आणि आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून आज किल्ले सिंहगडावर  गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीमेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या शेकडो मावळ्यांनी सिंहगडाच्या परिसरातील आणि कानाकोपऱ्यातील कचरा गोळा केला. गड किल्ले संवर्धन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार समाजात प्रसारित करून एक निकोप समाज व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयोजन असल्याचे  खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत ठीकठीकाणी स्वच्छतेचे पालन करण्यासाठी नागरिकांना पाणी पर्यटकांना आवाहन करण्यात आले. तर  गडावर दर्शनी ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले.

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळावर जिजाऊ वंदना आणि आपला मावळा गडकोट संवर्धन प्रतिज्ञा घेऊन स्वच्छता मोहीमेस सुरुवात  करण्यात आली. स्वयंसेवक कार्यकर्त्यांची एकवीस पथके करून गडावरील कल्याण दरवाजा, नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि छत्रपती राजाराम महाराज समाधी परिसर, कल्याण दरवाजा पुणे दरवाजा कलावंतिनीचा पुरुष बालेकिल्ला आदी  विविध ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, काटेरी झुडपे, काढण्यात आली. काचा गोळा करण्यात आला. बुरुंज आणि दरवाज्यावर वाढलेले आणि वाळलेले गवत काढण्यात आले. गवतात लुप्त झालेल्या पाऊलवाटा खुल्या  करण्यात आल्या. गडावर विविध ठिकाणी सोलर दिवे बसवण्यात आले.
स्वच्छता मोहिमेत माजी महापौर प्रशांत जगताप,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे, पंचायत समितीच्या माजी सदस्य सुरेखा दमिष्टे, दत्ता जोरकर  राहुल झावरे, इतिहासाचे अभ्यासक. डॉ. नंदू मते, अनिकेत चव्हाण वरीष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर , सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब इंगळे, यशवंत गोसावी, , पद्माकर लायगुडे,  आपला मावळा संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे यांच्यासह खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील तसेच  नगर, सातारा, सांगली , पुणेच्या विविध भागांतून आपला मावळा या संस्थेचे शिवभक्त मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते.

See also  कोथरूड शिवसेना डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या आणि विविध गावांवरून आलेल्या नागरिकांची व्यवस्था आणि नियोजन धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष अनिकेत चव्हाण यांनी केले तर जेवणाचे नियोजन दीपक खिरीड यांनी गोरे बुद्रुक येथील धर्माजी बाबा मंदिर परिसरात करण्यात आले होते.

शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागानं पार पडलेली ही मोहीम गडकोटांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून खासदार निलेश लंके हे राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता, वृक्षारोपण त्याचप्रमाणे संवर्धनाची कामं प्रत्येक महिन्याच्या एक रविवारी करत असतात. यापूर्वी त्यांनी शिवनेरी , रायरेश्वर, भुदरगड, धर्मवीर गडाची देखील स्वच्छता व संवर्धनाची कामं केले होते.

यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, “स्वराज्यातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारकं आहेत. ते शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची व पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. आपल्या या इतिहासाचं व गड किल्ल्यांचं जतन व संवर्धन करणं गरजेचं आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या किल्ल्यांचा ठेवा सुस्थितीत राहावा. आपला ऐतिहासिक वारसा आपल्या भावी पिढीला समजावा यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. दर महिन्याच्या एका रविवारी वेगवेगळ्या गडांवर ही मोहीम राबवली जाणार आहे.”

खासदार निलेश लंके यांनी स्वतः हातात झाडू घेऊन किल्ल्यावरील ऐतिहासिक परिसराची साफसफाई केली.
यावेळी गडावरील राजाराम महाराज समाधिस्थळ, सुभेदार तानाजी मालुसरे समाधिस्थळ, अमृतेश्वर मंदिर, वाहनतळ, पुणे दरवाजा , खांदकडा आदि परिसरांतील झाडे झुडपे काढण्यात आली . याचबरोबर पायी मार्ग समाधी परिसरात सौरदिवे , कचराकुंडी , नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी बाकडे, दिशादर्शक फलक उभारण्यात आले