कात्रज – शाळा परिसरातील पान टपर्या हटविणे, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक कोंडी, पदपथावरील फळ विक्रेत्यांची अतिक्रमणे, खराब रस्ते, ड्रेनेज, पाणी, वीज आणि कायदा व सुव्यवस्था संदर्भातील समस्या सोडवण्याची मागणी मोहल्ला कमिटीच्या मासिक बैठकित नागरिकांनी केली तर जीबीएस आजाराला रोखण्यासाठी पाणी उकळून पिण्याचे आवाहन क्षेत्रीय आरोग्य विभागाने केले.
नागरी समस्या सोडवण्यासाठी मोहल्ला कमिटी बैठकांना नागरिकांची उपस्थिती वाढवण्यात यशस्वी ठरलेल्या धनकवडी – सहकारनगर कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहल्ला कमिटीची मासिक बैठक पार पडली. सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, कात्रज व आंबेगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मंचाचे प्रतिनिधी सहभागी होवून आपल्या समस्या मांडल्या. सहाय्यक आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देवून या समस्यांचा निपटारा करण्याचे आदेश दिले. केलेल्या कामांचे इतिवृत्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे नागरिकांना आश्वासन यावेळी देण्यात आले. दक्षिण पुण्यात फैलावत असलेल्या जीबीएस या आजाराला आळा घालण्यासाठी क्षेत्रीय वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वाती बढीये यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. महिनाभर बाहेर न खाणे आणि पाणी उकळूनच पिण्याचे आवाहन केले. बैठकिला सर्व विभागांचे अभियंते उपस्थित होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक उपस्थित होते.