पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे २१ ते २६ जुलै २०२५ या कालावधीत ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (आय.ओ.टी.)’ या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळा उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. प्रत्येक दिवशी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक मा. श्री. चित्तरंजन महाजन (संस्थापक, डॉल्फिन लॅब्स) यांनी विद्यार्थिनींना नवतंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “आय.ओ.टी. म्हणजे केवळ यंत्रांचे जाळे नाही, तर भविष्यातील तांत्रिक परिवर्तनाचा आधारस्तंभ आहे.” प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी आपल्या मनोगतात नमूद केले, “विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली, हीच या कार्यशाळेची खरी यशोगाथा आहे.”
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींना मायक्रोकंट्रोलर, मायक्रोप्रोसेसर, आर्डुइनो सॉफ्टवेअर, तसेच विविध संवेदक (सेन्सर्स) यांच्या संयोगाची सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. ब्लूटूथ आधारित नियंत्रण, आय.ओ.टी. आधारित मोटर नियंत्रण, संख्यात्मक व अँनालॉग सिग्नलचे वाचन व लेखन या विषयांवर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थिनींना नोडएमसीयू, एच.टी.एम.एल., आणि रास्पबेरी पाय या तंत्रज्ञानांची ओळख करून देण्यात आली.
विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी विद्यार्थिनींनी दाखवलेल्या तांत्रिक उत्साहाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. सविता इटकरकर, प्रा. डॉ. श्वेता साळुंखे आणि प्रा. यशोमती धुमाळ यांनी समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे व उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार यांचीही कार्यशाळेच्या काळात उपस्थिती लाभली.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध आय.ओ.टी. प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीने व प्रेरणादायी मार्गदर्शनाने विद्यार्थिनींमध्ये नवतंत्रज्ञानाबाबतचा आत्मविश्वास अधिकच बळावला. कार्यशाळेत सहभागी सर्व ११५ विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ही कार्यशाळा विद्यार्थिनींसाठी तांत्रिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्य आणि नवदृष्टी प्राप्त करण्याची एक मोलाची संधी ठरली.