पुणे : येथील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक वाचनाने झाली, ज्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या उपक्रमांतर्गत ग्रंथ वाचनासह, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ परीक्षण व कथन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक डॉ. श्रीकांत कल्लूरकर यांनी उपस्थिती लावली. “वाचाल तर वाचाल” या विचारांना अनुसरून त्यांनी वाचनाच्या सवयीसाठी पंचसूत्री सांगितली.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे ‘वाचन कौशल्य’ या विषयावरील कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेत जीवन कौशल्य म्हणून वाचनाचे महत्त्व विषद करण्यात आले. तसेच, ‘वाचन, लेखन आणि भाषा’ या विषयावर मान्यवर लेखकांबरोबर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ग्रंथपाल किरण काळे, राजेश शेलार आणि हेमंत निकाळजे यांनी प्रयत्न केले . या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी वाढण्यास मदत होईल, असे आयोजकांनी सांगितले.