पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले सिंहगड येथे जिल्हास्तरीय गड संवर्धन शिबीर आयोजित करण्यात आले. या एकदिवसीय शिबिरात ५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शिबिराची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीत आणि राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर करून झाली. त्यानंतर स्वच्छता मोहिमेंतर्गत सिंहगड किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. किल्ल्यावरील तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान, शिवगर्जना, शिवघोषणा, पोवाडे आणि पारंपरिक पाळणे सादर करण्यात आले. तसेच सर्व स्वयंसेवकांनी एकत्र येऊन शिवशपथ घेतली.
विशेष म्हणजे, सिंहगड किल्ल्यावर भेट देणाऱ्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील या अभियानात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना गड संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वयंसेवकांनी संवाद साधला. या उपक्रमात पुण्यातील पाच महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आणि समन्वयक प्रा. सविता इटकरकर, प्रा. डॉ. स्मिता जाधव आणि प्रा. सीमा हाडके यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला. हा उपक्रम नव्या पिढीमध्ये गडसंवर्धन व स्वच्छतेच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करणारा ठरला.