सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्याने गुन्हेगारांसोबत स्वतःचा वाढदिवस पोलीस स्टेशनच्या दारात साजरा केल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडून तातडीने दखल घेत पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
सांगवी पोलीस स्टेशनच्या दारात रात्री बाराच्या ठोक्याला पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ सोशल
मीडियावर व्हायरल झाला आहे. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी पोलिस स्टेशनच्या दारात केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून केक कट केल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
यावेळी चार गुन्हेगार उपस्थित होते विशेष म्हणजे उपस्थित असलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या वाढदिवसाचे आयोजन केल्याची माहिती समोर आली आहे. या चार पैकी दोघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे आणि दोघांवर हाणामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस खात्याकडून प्राप्त झाली आहे. दोघांनी फटाक्यांची फायर गन बाहेर काढली दुसरीकडे स्काय शॉट आणि बॉम्ब फुटू लागले ही आतिशबाजी बराच वेळ सुरू होती, या सगळ्या प्रकाराचा ड्रोन द्वारे चित्रीकरण चित्रीकरण करण्यात आले. या बर्थडे सेलिब्रेशन प्रकरणी सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर
पोलीस आयुक्त विनयकमार चौबे यांनी पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, सुहास डोंगरे, विजय मोरे यांना निलंबित केले आहे.