अनाधिकृत होर्डिंग बाबत होर्डिंग मालक व पालिकेचे अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करावी खासदार मेधा कुलकर्णी यांची पुणे आयुक्तांकडे मागणी

पुणे : घाटकोपर मधील होर्डिंग पडून अनेकांचे प्राण गमवल्याची घटना ताजी असतानाच, मोशी येथील होर्डिंग पडल्याची घटना  व पुणे येथे पुणे-सोलापूर रस्त्याच्याकडेला होर्डिंग पडून घोडा मृत झाल्याची घटना घडली आहे. यातून नागरिकांच्या मनात प्रशासनाबद्दल राग व अविश्वासाहर्ता निर्माण झाली आहे. पुणे येथील रेल्वे स्टेशन परिसरातील घटना ही याच पार्श्वभूमीवर स्मरणात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांना निवेदन दिले. अनाधिकृत आणि असुरक्षित होर्डिंग्ज बाबत, होर्डिग्ज मालकाला दोषी धरण्यासोबतच, पुणे महानगरपालिका अधिकारी यांना उत्तरदायी धरून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनामध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.
जाहिरात व फलक नियंत्रण नियम 2022 , इतर सर्व नियम, आदेश, संलेख यांच्यानुसार आकाशचिन्ह व जाहिरातींचे जे नियम आहेत त्यात, इमारतींच्या प्रकारावर/ गच्चीवर जाहिरातींची उंची 20 फुटांपेक्षा अधिक असू नये. रस्त्याच्या पृष्ठभागावर 40 फुटपेक्षा अधिक उंचीचे फलक उभारले जाऊ नयेत. ज्यात 10 फुट किमान अंतर तलीय सूट व 30 फुट जाहिरात धरून 40 फुट एकूण उंची होईल.असे नियम असतानाही हे नियम धाब्यावर बसवून फलक लावण्यात आलेले असताना परवानगी कोणी दिली याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.


तसेच पुणे येथील रेल्वे स्थानकाजवळील होर्डिंग दुर्घटनेच्या वेळी अनधिकृत फलकांची संख्या 85 सांगितली होती. (प्रत्यक्षात ती खूप असल्याचे दिसते.) पण हे गृहीत धरले तरी 85 हाच आकडा आजही सांगत आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षात एकही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झाली नाही. मनपाच्या दारातील PMPML च्या फलकाला ठिकाण निश्चित करण्याआधी ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच PMPML चे बहूतेक होर्डींग बेकायदेशीरपणे उभारलेली आहेत का ? असतील तर का? आणि त्यावर कारवाई कधी होणार. पुणे शहरातील होर्डिंग्ज लावताना होर्डिंग धारक स्वत:च स्टक्चरल गॅरेंटी देतो व तसा Report पुणे मनपाला देतो जो ग्राह्य धरून परवानगी दिली जाते. ही बाब हास्यास्पद आहे. पुणे मनपाकडे या होर्डिंग्जच्या Structural Audit करण्याची स्वत:ची यंत्रणा हवीच व ती खात्री प्रशासनाला झाल्याशिवाय होर्डिंग्जला परवानगी देऊ नये. पुणे शहरात एकूण 3000/3500 फलक आहेत. असे पुणे मनपा सांगते. प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये त्यांच्या भागातील होर्डिंग बाबतचे सर्वे करण्याचे काम देऊन ते आठवड्यात पूर्ण करण्यास सांगावे.

See also  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोरेश्वर बालवडकर यांच्या वतीने आरोग्य योजनेसाठी धनादेश

सदर सर्व प्रकरणात जसे होर्डिंग मालक जबाबदार आहेत तसे पुणे मनपा प्रशासनही जबाबदार आहेच. तरी सदोष मनुष्यवधाचा व सदोष प्राणीवधाचा गुन्हा, वित्तहानी इ. गुन्हे दाखल करून सदर अधिकाऱ्यांना कठोर शासन करावे, अशी आग्रही मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.