सुस : सुस रोड, रवी नगर जवळ सहा महिन्यांपूर्वी काँक्रीट रोड खोदून पाण्याची लाईन टाकण्यात आली यानंतर पुन्हा काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी खोदकाम करून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. खोदा पैसे कमवा आणि पुन्हा खोदा असा प्रकार सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या विभागांच्या कामांसाठी खोदकाम करणाऱ्यांसाठी परवानगी दिली जात असल्याने समन्वयाअभावी नागरिकांच्या कडून करोडो रुपयांचा निधी वाया जात असून नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी पुणे मनपा आयुक्तांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
सुस बाणेर परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने कोट्यावधी रुपयांचे बजेट टाकले आहे. परंतु याबाबत नियोजन करण्यात आलेले नाही यामुळे राजकीय कार्यकर्ता सांगेल त्याप्रमाणे प्रशासन काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासनाच्या विभागांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र समोर येत असून सातत्याने होत असलेली खोदकामे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विकसित होत असलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा ड्रेनेज व विद्युत विभाग तसेच पथविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कामे करण्यात यावीत त्यामुळे सातत्याने खोदकाम होणार नाही. तसेच पालिकेचा कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची बचत होईल व नागरिकांना देखील वाहतूक कोंडी व सततच्या खोदकामापासून सुटका मिळेल.
प्रशासन, काही माजी नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहे. यामुळे प्रशासकीय व नागरिकांची सोय न पाहता ठेकेदारांचे भले करण्याचे काम पालिकेकडून केले जात आहे. काँक्रीट रस्ते तयार करून खोदकाम करण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची व विभागाची चौकशी करण्यात यावी. तसेच पुणे महानगरपालिकेच्या विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी समिती तयार करण्यात यावी अशी मागणी जयेश मुरकुटे यांनी केली आहे.