पुणे : कात्रज येथील समृद्धी हाईट्स सोसायटीत यंदा पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वृक्षसंवर्धन, पाण्याची बचत आणि हरित पर्यायांचा अवलंब करत सामाजिक जाणीव ठेवून हा सण साजरा करण्यात आला.
होळी साजरीसाठी निसर्गस्नेही उपाय
यावेळी कमीतकमी परंपरागत लाकडाचा वापर करण्यात आला त्या ऐवजी इंजिनियरिंग वूड, वाळलेल्या काड्या आणि नैसर्गिक इंधनाचा वापर करण्यात आला. यामुळे झाडांची तोड टाळली गेली आणि कार्बन उत्सर्जन कमी झाले. होळी पेटवण्यासाठी सुकलेल्या पानांचे दहन करून पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
रासायनिक रंगांना फाटा, नैसर्गिक रंगांचा वापर
सोसायटीच्या रहिवाशांनी धूळवडीसाठी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक गुलाल आणि फुलांच्या पाकळ्या वापरण्याचा निर्णय घेतला. तसेच, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरडी होळी खेळण्यात आली.
स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम
पर्यावरणप्रेमी मंडळ आणि स्थानिक स्वच्छता गटाच्या मदतीने सोसायटी परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला. यावेळी वृक्षारोपण आणि पाणी संवर्धनाचे संकल्प घेण्यात आले.
सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने आवाहन करतांना म्हटले की , “सण साजरा करताना निसर्गसंतुलन राखणे आवश्यक आहे.” या उपक्रमामुळे समृद्धी हाईट्स सोसायटीच्या पर्यावरणपूरक होळीची परिसरात मोठी चर्चा आहे.